पुणे, 21 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसने चीनमध्ये (China coronavirus) हाहाकार माजवला असून तिथल्या अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. मात्र हा व्हायरस भारतात किंवा महाराष्ट्रात आला नसताना इथंही त्याचा फटका बसताना दिसत आहे. चिकन विक्रेत्यांवर कोरोनाचा परिणाम झाल्यानंतर आता याच व्हायरसमुळे सोन्याचे भाव वाढल्याचं समोर आलं आहे.
चीनमध्ये कोरोनाने घातलेले थैमान तसेच आर्थिक मंदी आणि अनेक देशांच्या चलनाची घटलेली किंमत ही सोन्याच्या ऐतिहासिक दरवाढीची कारणे असल्याचं सराफ असोसिएशनचे प्रमुख फत्तेचंद रांका यांचं म्हणणं आहे. सोन्याचे भाव वाढल्यानंतर ज्यांचं घरात लग्नकार्य आहे, असे नागरिक चिंतेत पडले आहेत. वाढलेल्या सोन्याच्या दराबाबत आश्चर्य व्यक्त करतानाच घरात कार्य आहे, लग्नसराई आहे, त्यामुळं खरेदी करावी लागणार अशी प्रतिक्रिया ग्राहक देत आहेत.
दरम्यान, चिनी कोरोनाव्हायरसचा ( महाराष्ट्राला (Maharashtra) मोठा फटका बसला आहे. चिकन खाल्ल्यामुळे कोरोनाव्हायरस होतो, अशी अफवा पसरली आणि त्याची धास्ती घेऊन सर्वांनीच चिकनकडे पाठ फिरवली. परिणामी पोल्ट्री फार्म उत्पादकांचं तब्बल 150 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने पत्रकार परिषदेत दिली.
पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीपर्यंत चिकनचा विक्री दर ठीक होता. मात्र चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो अशी अफवा 4 फेब्रुवारीला पसरली आणि त्यामुळे चिकनचा खप कोसळला. हा खप 3,500 मेट्रिक टनवरून 2000 मेट्रिक टन म्हणजे तब्बल 20 लाख किलोवर आला. यामुळे तब्बल 150 करोडचं नुकसान झालं आहे. अंडे विक्रीवर मात्र काहीही परिणाम झालेला नाही.
चिकन खाल्यामुळे कोरोनोव्हायरस होतो या अफवेविरोधात राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारच्यावतीने सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल केला आहे. या अफवेमुळे मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्म उत्पादकांचं नुकसान झालं असल्याने गुन्हा दाखल केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. राज्यात एकूण 7 कोटी 42 लाख कुक्कुट पक्षी आहेत, तर 60 टक्के मांसाहारी लोक आहेत. आता हा खप 2,400 मेट्रिक टनपर्यंत वाढला आहे, असं पशुसंवर्धन विभागानं सांगितलं.
चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. खुद्द केंद्र सरकारने याची पुष्टी दिली आहे. चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होत नाही, असं केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. 'चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका’, असं पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं होतं. जर कोणालाही काहीही शंका असतील तर पशुपालन विभागाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus