• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • बँकेतील कर्मचाऱ्यांना झाली कोरोनाची लागण, धनंजय मुंडेंनी घेतला परळीत कर्फ्यू लावण्याचा निर्णय

बँकेतील कर्मचाऱ्यांना झाली कोरोनाची लागण, धनंजय मुंडेंनी घेतला परळीत कर्फ्यू लावण्याचा निर्णय

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही लोकांना संसर्ग झाल्याची भीती आहे.

 • Share this:
  मुंबई, 6 जुलै : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर विविध सेवा पूर्ववत झाल्या आहेत. मात्र त्यानंतर आतापर्यंत कोरोनापासून दूर असलेल्या भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. परळीत स्टेट बँकेतील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही लोकांना संसर्ग झाल्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि परळीचे लोकप्रतिनिधी असलेल्या धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'स्टेट बँकेतील काही कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे कळले. घाबरण्याचे काही कारण नाही मात्र दक्षता म्हणून आपण परळी शहरात पुढील 8 दिवस संपूर्ण संचारबंदी लागू करत आहोत. तसेच काही गावांमध्ये आवश्यकतेनुसार कंटेंटमेंट झोन लागू करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत,' अशी माहितीही फेसबुक पोस्टद्वारे धनंजय मुंडे यांनी दिली आहे. काय म्हणाले धनंजय मुंडे? 'आरोग्य विभागामार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आपण राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले असल्यास, किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आल्यास त्याची माहिती स्वतःहुन प्रशासनास द्या, तपासणी करून घ्या. कोरोनाविरोधात लढून आपल्याला ही साखळी तोडायची आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा. मी सातत्याने यंत्रणेच्या संपर्कात आहे. घाबरुन जायचं काहीही कारण नाही, सर्वांनी काळजी घ्या, सतर्क रहा,' असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात काय आहे कोरोनाची स्थिती? बीड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 7 जणांनी जीव गमावला आहे. जिल्हयात आतापर्यंत 151 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 113 कोरोना मुक्त झाले असून इतर 32 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संकलन, संपादन - अक्षय शितोळे
  Published by:Akshay Shitole
  First published: