मुंबई, 3 मार्च : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मात्र त्यामुळे समाजातील विविध घटकांवर मोठा परिणाम झाला आहे. गरिबांना पोट भरण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही घोषणा केल्या आहेत. मात्र राज्य सरकारने मात्र काही अटी टाकल्याचा आरोप भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
'आगामी 3 महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत. आधी विकत मिळणारे रेशन घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतले, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरूपाच्या या अटी आहेत,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
'माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी या अटी मागे घ्याव्यात. आज गरिबांना धान्य मोफत मिळणे अतिशय आवश्यक आहे. रेशन कार्ड असो वा नसो, धान्य देण्याचेच निर्णय अन्य राज्यांनी सुद्धा घेतले आहेत,' असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा- मोदींच्या सूचनेनंतर लॉकडाऊन संपवण्यासाठी तयारी, समोर आला 4 आठवड्यांचा नवा प्लॅन
'केंद्रीय नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, 3 महिन्यांसाठी आवश्यक धान्यापैकी 90 टक्के कोटा उपलब्ध झाला आहे. उर्वरित 2 दिवसात उपलब्ध होईल. त्यामुळे 3 महिन्यांचे धान्य राज्य सरकारने एकत्र द्यावे,' अशी मागणी करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला घेरलं आहे.