कोरोना झाल्यानंतरही कसे होणार घरीच उपचार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कोरोना झाल्यानंतरही कसे होणार घरीच उपचार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 80 टक्के कोरोना बाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत

  • Share this:

सातारा, 5 ऑगस्ट : कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षणे नसलेल्या किंवा अति सौम्य लक्षणे असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या तपासाअंती रूग्णांवर जिल्ह्यामध्ये आता गृह विलगीकरणात उपचार करण्यात येणार आहेत. ते उपचार काय आणि कसे असणार आहेत. याबद्दल जनतेत संभ्रम होऊ नये म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी पुस्तिका ऑनलाईन प्रसिद्ध केली आहे, नुकतीच ती QR कोडसह सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 80 टक्के कोरोना बाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे या सर्वांचे आता गृहविलगीकरण करुन उपचार करणे शक्य होणार आहे.

अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना त्यांच्या घरामध्ये योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देताना मार्गदर्शक सूचना :

- वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर तपासून तो अति सौम्य व लक्षणे नसलेला आहे हे प्रमाणित केल्यानंतर गृह विलगीकरणाबाबतची माहिती देतील.

- रुग्णांसाठी खेळती हवा असलेली आणि स्वतंत्र स्वच्छतागृह असलेली खोली असणे तसेच घरातील काळजी घेणारी व्यक्ती 24 तास उपलब्ध आवश्यक आहे. नसल्यास रुग्णाची व्यवस्था कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येईल.

- गृह विलगीकरणानंतर पुढील दहा दिवस रुग्णांची नियमित तपासणी फोनद्वारे करण्यात येईल.

- दहा दिवसांमध्ये कोणतेही लक्षण न आढळल्यास रुग्ण गृह विलगीकरण संपवू शकतो. विषेश बाब म्हणजे विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.

- घरातील कोणीही व्यक्ती (55 वर्षापेक्षा जास्त वय असलेले) इतर आजार, उच्च रक्तदाब, मधुमेय, ह्दयविकार, जुनाट यकृत, फुप्फूस, मूत्रपिंडाच्या रूग्णांची कोरोनाचा रुग्ण बरा होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी.

- आरोग्य सेतू ॲप असणे आवश्यक. तसेच नोटिफीकेशन्स, ब्लुटूथ आणि लोकेशन ट्रॅकिंग पुर्ण वेळ चालु राहणे गरजेचे आहे.

- रुग्ण गृह विलगीकरणात असताना 1 टक्के सोडियम हायपोक्लोराईटच्या साहाय्याने सतत संपर्कात येणाऱ्या गोष्टी उदा : स्विच बोर्ड, खिडक्या, दरवाजाचे नॉब, खुर्ची, जेवणाचे टेबल, कपाट इ. साफ कराव्यात.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात सध्या 29 कोविड केअर सेंटर आणि 11 कोविड हॉस्पिटल आणि 8 कोविड हेल्थ सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मागील 2 महिन्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. इतर शहरांमध्ये अशाच पद्धतीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठीच जिल्ह्यात आता गृह विलगीकरण हा पर्याय जिल्हा प्रशासनाने समोर आणला आहे.

रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य वा अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना हॉस्पिटलऐवजी त्यांच्याच घरी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधीचे आवाहन केले आहे. इतरांशी कोणत्याही प्रकारचा थेट संपर्क येण्यापासून स्वतःला दूर ठेवून विलगीकरण केल्याने या विषाणूचा संसर्ग इतर व्यक्तींनाही होण्याची शक्यता कमी होते.

Published by: Akshay Shitole
First published: August 5, 2020, 5:55 PM IST

ताज्या बातम्या