बीड, 27 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात येवले वस्तीवरील महानुभाव आश्रमामध्ये तब्बल 29 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे अॅन्टीजन टेस्ट मोठ्या प्रमाणत केल्या जात आहेत.
गेवराई शहराजवळील कोल्हेर येवले वस्तीवर असलेल्या महानुभाव पंथीयांच्या आश्रमात 25 फेब्रुवारी रोजी धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला अनेक साधकांनी हजेरी लावली. या आश्रमात कायमस्वरूपी राहणाऱ्या साधकांची संख्यादेखील मोठी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आश्रमातील जवळपास 60 साधकांची अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये तब्बल 29 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले.
एकाच आश्रमात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासन हादरलं आहे.
हेही वाचा - ...म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय; लोकलमधील मास्कचा जुगाड पाहून आनंद महिंद्रा वैतागले
दरम्यान, गेवराई तहसीलदार सचिन खाडे आणि तालुका अधिकारी यांनी आश्रमास भेट दिली असून गुरुवारी झालेल्या धार्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या लोकांनी कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
याबरोबरच प्रशासनाने बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे.