आजारी वडिलांना भेटण्यासाठी मुलानं केला दुचाकीनं प्रवास, पण बापानंच घेतलं नाही घरात!

आजारी वडिलांना भेटण्यासाठी मुलानं केला दुचाकीनं प्रवास, पण बापानंच घेतलं नाही घरात!

तू इथे आला कशाला? इथे राहू नको निघून जा, तू इथं थांबला तर शेजारी-पाजारी मलाही त्रास देतील..

  • Share this:

शिर्डी, 26 एप्रिल: मुंबईहून थेट दुचाकीवर तो आपल्या आजारी असलेल्या वडिलांना भेटायला गावी आला खरा, मात्र कोरोनाने त्याला घरच्यांपासून दूरच ठेवलं. अतिशय हृदयद्रावक अशी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. कोरोनामुळे आपल्या पोटच्या मुलाला दूर ठेवण्याची वेळ आई आणि आजारी बापावर आली.

झालं असं की, सध्या कोरोनाच्या महामारीनं मुंबई परिसरात थैमान घातलं आहे. प्रशासनाने मुंबईतील अनेक भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेले आहेत. नरिमन पॉइंट मुंबई येथे एका बँकेत वाहनचालक म्हणून नोकरी करीत असलेला मालाडमधील एक जण 24 एप्रिल रोजी सकाळी आपल्या दुचारीवर घोटी इगतपुरीमार्गे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात पोहोचला. वडिलांची बायपास सर्जरी झालेली असल्याने त्यांना भेटावयास तो आला होता. मध्यरात्री घरी पोहचलेल्या आपल्या लेकराला वडिलांनी मात्र घरात येण्यास मनाई केली.

हेही वाचा..दूरूनच चेहरा पाहून होणार कोरोनाची तपासणी, शास्त्रज्ञांनी तयार केलं उपकरण

'रात्री तू मुंबईहून आलास.. तू इथे आला कशाला? इथे राहू नको निघून जा, तू इथं थांबला तर शेजारी-पाजारी मलाही त्रास देतील, अगोदरच मी हृदयविकाराने त्रस्त आहे, मला त्रास नको..' कोरोनामुळे असं सांगण्याची वेळ या बापावर आली.

आपल्या घरच्यांनीच घरात येवू न दिल्याने राहुरी शहरातील मंदिराचा त्याने आसरा घेतला आणि तिथेच झोपी गेला. त्यानंतर 25 एप्रिल रोजी त्यास शहरातील पोलिसांनी विचारपूस करून आरोग्य विभागाकडे पाठविले असता त्याच्या हातावर होम क्वारटाईन शिक्का मारून इतरत्र न फिरता घरी जाण्यास सांगण्यात आलं. मात्र, वडिलांनीच घरात येण्यास नकार दिल्याने आता कुठे जावे असा प्रश्न त्याला पडला आणि त्यानं 25 तारखेची रात्र राहुरीच्या बस स्टॅन्डवरच घालवली. 26 एप्रिल रोजी तो राहुरी शहरातच दुपारपर्यन्त फिरत राहिला.

गाडगे महाराज आश्रम शाळेत निवासाच्या दृष्टीने गेला, मात्र या ठिकाणी जागा शिल्लक नाही असे सांगून राहुरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालयातील निवासी कॅम्प येथे जाण्यास सांगण्यात आले. आपल्याला कुठं तरी राहण्यासाठी निवारा शोधत तो फिरत राहिला.

हेही वाचा..सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा, फटाक्याच्या धुरातून रुग्णाला चालतच आणलं घरी

दरम्यान दुपारी राहुरी फॅक्टरी बस स्टॅन्ड येथे नगर- मनमाड मार्गावर जाणाऱ्या वाहन चालकांना चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पाणी वाटप करत असताना त्यांनी सदर व्यक्तीची विचारपूस केली. त्यानंतर चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी सदर प्रकार तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांना सांगितला. त्यांनी सदर व्यक्तीस होम क्वारन्टाईन राहण्यास सांगितलं असल्याचं उत्तर दिलं. मात्र या व्यक्तीला घरच्यांनीच घरात घेण्यास नकार दिल्याने आता करायचं काय असा प्रश्न गणेश भांड यांनाही पडला होता.

अखेर वैद्यकीय अधिकारी अण्णासाहेब मासाळ यांच्याशी संपर्क करून या व्यक्तीला अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे. आता चौदा दिवस नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच तो क्वारन्टाईन राहणार आहे.. त्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झालीय की नाही? हे देखील स्पष्ट होईल.. मात्र या घटनेमुळे आपल्या पोटच्या मुलाला दूर ठेवण्यास कोरोना आडवा आला, याचा प्रत्यय आला.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 26, 2020, 11:45 PM IST

ताज्या बातम्या