विजय कमळे पाटील,प्रतिनिधी
जालना, 14 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. परंतु, जालन्यातही कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला असून औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशा व्हॉट्सअॅप मॅसेजमुळे एकच खळबळ उडाली. मात्र, जेव्हा सत्य समोरं आलं तेव्हा जालनेकरांचा जीव भांड्यात पडला.
असा तो व्हॉट्सअॅप मॅसेज!
"मुळ जालन्याच्या खारपुडीचा रहिवासी असलेला 22 वर्षीय तरुण पुण्याला काही कामानिमित्त नोकरीसाठी गेला होता. दोन दिवसांपूर्वी तो पुण्यावरून जालन्याला रेल्वेस्टेशनवर उतरला. यानंतर तो थेट खरपुडीत पोहोचला. घरी आल्यावर तरुणाला ताप येण्यास सुरूवात झाली. प्रकृती खालावत असल्याने आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना? असा संशय आल्याने सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तरुणाला थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात धाव घेतली. डॉक्टरांना कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळल्याने तरुणावर उपचारास सुरुवात करण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचार सुरू आहेत.कोरोना आयसोलेशन वार्डात दाखल होताच रुग्णाच्या घशातील श्वासाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी तत्काळ पुण्याला पाठवण्यात आले आहेत. नमुन्यांचा तपासणी अहवाल येण्यास दोन दिवसांचा अवधी लागणार आहे.
कोरोनाचा एक संशयित रुग्ण दाखल झाला आहे. त्यावर उपचार सुरू असून नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसांत तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील उपचार सुरू करण्यात येतील. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय औरंगाबाद.
व्हॉट्सअॅप मॅसेज निघाला फेक!
सदर व्हॉट्सअॅप मॅसेज बातमीच्या स्वरूपात असल्यामुळे तसंच त्यात औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून एका डॉक्टराचं नाव आणि पदाचा उल्लेख केलेला असल्यामुळे लोकांचा यावर जास्त विश्वास बसतोय. सदरील मॅसेजमध्ये आपल्या गावाचं नाव आल्याने तो संशयित आढळलेला इसम नेमका कोण..? याची उत्सुकता आणि भीती ग्रामस्थांमध्ये पसरली. परंतु, असा कोणताच इसम गावात नसल्याचं गावकऱ्यांच्या चौकशीत समोर आलं. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून देखील खरपुडीत कोरोनाचा कुठलाच संशयित आढळला नसून सदर मॅसेज फेक असल्याचा खुलासा ही करण्यात आलाय.
खरपुडीचे गावकरी झाले बेजार
मात्र, तुमच्या गावात कोरोनाचा संशयित कोण याची ग्रामस्थांना जिकडे-तिकडे विचारणा होऊ लागली. प्रत्यक्ष भेटीनंतर आणि फोन कॉल किंवा सोशल मीडियावर देखील लोकांचा खरपुडीच्या ग्रामस्थांना हाच प्रश्न आज देखील विचारला जात आहे. खरपुडीच्या ग्रामस्थानकडे लोकं संशयाच्या नजरेतून पाहू लागले आहेत. मात्र, असा काहीच प्रकार गावात घडलाच नसल्याचं स्पष्टीकरण देत- देत खरपुडीचे ग्रामस्थ आता बेजार झाले आहे. एका सजग ग्रामस्थाने तर थेट औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात फोन करून या प्रकाराची शहानिशा केली आणि आपली कैफियत देखील मांडली.
एवढंच नव्हे तर खरपुडीच्या ग्रामस्थांनी गावाचा सर्व्हे करून आमच्याकडे पुण्याहून कोणीही आलेलं नसून गावात कोरोनाचा कुठलाही संशयित नसल्याचं लेखी पत्रच आरोग्य विभागाला पाठवलं आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णाच्या या अफवेमुळे खरपुडीचे ग्रामस्थ एवढे धास्तावलेत की, आजही याविषयी कुणीही कॅमेऱ्यावर काहीही बोलायला तयार नाही.
दरम्यान, कोरोना संदर्भात नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता who च्या अधिकृत वेबसाईटवरूनच माहिती मिळवावी. कोरोनासंदर्भात सोशल मीडियावरून कुणी अफवा पसरवण्याचे काम करताना आढळल्यास नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे, त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील जालना पोलिसांकडून देण्यात आला आहे.