बीड, 17 मे: बीड जिल्ह्याच्या सीमेवरील चेक पोस्टवर इतर जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांकडून पोलिस चिरीमिरी (पैसे) घेऊन त्यांना अनधिकृत प्रवेश देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे खुद्द अप्पर पोलिस अधीक्षकांनी स्टिंग ऑपरेशन करून पोलिस विभागातील लाचखोरीचा पर्दाफाश केला आहे.
जिल्ह्याच्या हद्दीत तपासणी नाक्यावर पोलिस काही नागरिकांना विनापरवानगी प्रवेश देत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले. तपासणीत नाक्यांवरील 3 पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.
हेही वाचा.. BREAKING:माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षकासह एक कॉन्स्टेबल शहीद
बीड जिल्ह्यात प्रवेश करण्याचा परवाना नसला तरी पोलिस चिरीमिरी घेऊन अनेकांना अनधिकृत प्रवेश देत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बीडचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी तपासणी नाक्यांवर डमी प्रवासी पाठवून या तक्रारींचे स्टिंग केलं. या डमी प्रवाशांला जिल्ह्यात येण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकारात तीन पोलिस कर्मचारी दोषी आढळून आले. या प्रकरणाची गंभीर दखर घेऊन पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार एम.के.बाहिरवाल, डी.बी. गुरसाळे, एस.बी.उगले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे,
हेही वाचा.. मोठी बातमी! महाराष्ट्रात 31 मेपर्यंत वाढवला LOCKDOWN, वाचा कसा असेल चौथा टप्पा
बीड जिल्ह्यात कुंपणच शेत खात असल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. बीड जिल्ह्यात 14 ठिकाणी तपासणी नाके असले तरी नाक्यावरून आणि चोरट्या मार्गाने अनेक लोक जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. आता प्रशासनाला जाग आली असून यावर नाक्यांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.