नाशिक, 27 एप्रिल: नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरोना कक्षातच कोरोना विषाणू शिरला आहे. एका ट्रेनी डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह ट्रेनी डॉक्टर 24 वर्षाचा असून तो नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षातील OPD मध्ये कार्यरत होता. हॉस्पिटलमधील अनेकांची उद्या सोमवारी स्वॅब टेस्ट होणार आहे.
राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आता राज्यातील प्रत्येक शहरामध्ये कोरोनाची महामारी पसरत चालली आहे. नाशिक जिल्ह्यात 6 तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून रुग्णांची संख्या 148 झाली आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
हेही वाचा.. आजारी वडिलांना भेटण्यासाठी मुलानं केला दुचाकीनं प्रवास, पण बापानंच घेतलं नाही घरात
छगन भुजबळांच्या येवल्यातही कोरोनाचा शिरकाव...
नाशिक, मालेगावनंतर आता ग्रामीण भागात कोरोनानं शिरकाव केला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. येवला येथील 5 तर आदिवासी आणि दुर्गम भागात असलेल्या सुरगाणा येथे एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नाशिक जिल्ह्यातिल कोरोना बाधितांनाचा आकडा 148 वर पोहोचला आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
हेही वाचा..दोनदा रुग्णालयात गेली तरी दाखल करून घेतलं नाही, अखेर घरीच झाली महिलेची प्रसूती
कोरोनानं डॉक्टरचा घेतला बळी
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात शनिवारी एका 71 वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. संबंधित डॉक्टर कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर मालेगावमधील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी कोरोनामुळे आणखी 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील 12, पुणे महापालिका क्षेत्रातील 3, जळगाव येथे 2 , सोलापूर शहर आणि लातूर येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 1 लाख 16 हजार 345 रुग्णांची तपासणी केली असून त्यात एक लाख सात हजार 519 रुग्णांचे तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 8668 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या 604 कंटेनमेंट झोन असून 1603 सर्वेक्षण पथकं काम करत आहे.
संपादन- संदीप पारोळेकर