कोरोनाचा धसका, यवतमाळमध्ये 20 जण 'होम कॉरेंटाईन'

कोरोनाचा धसका, यवतमाळमध्ये 20 जण 'होम कॉरेंटाईन'

यवतमाळ येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या ‘त्या’ 9 नागरिकांपैकी दोन नागरिकांचे नमुने पॉझेटिव्ह आले होते

  • Share this:

यवतमाळ, 15 मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. यवतमाळमध्ये 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यानंतर आता आणखी 20 नागरिकांना होम कॉरेटाईन करण्यात आलं आहे. यात विदेशातून आलेल्या 4 नागरिकांचा समावेश आहे.

यवतमाळ येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या ‘त्या’ 9 नागरिकांपैकी दोन नागरिकांचे नमुने पॉझेटिव्ह आले होते. त्यामुळे गत 14 दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोधमोहीम प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 20 नागरिकांना होम कॉरेंटाईन करण्यात आले असून यात विदेशातून आलेल्या चार नागरिकांचा समावेश आहे.

या 20 लोकांमध्ये आतापर्यंत कोणतेही लक्षण आढळून आले नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना कॉरेंटाईन करण्यात आलं आहे. आरोग्य पथकाडून त्यांची नियमितपणे विचारपूस करण्यात येत आहे. याशिवाय दुबईवरून आलेल्या ‘त्या’ 9 नागरिकांपैकी दोघांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले असून त्यांचा रिपोर्ट अद्याप प्राप्त व्हायचा आहे.

विदेशातून आलेल्या चार नागरिकांनी स्वत:हून संपर्क साधला. यातील 3 नागरिक थायलंडमधून तर 1 जण अजर बैजान (युरोप खंडातील देश) येथून जिल्ह्यात दाखल झाला होता. तालुकास्तरीय आरोग्य पथकाकडून त्यांनासुद्धा होम कॉरेंटाईन करण्यात आलं आहे. अद्याप या नागरिकांमध्ये कोणतेही लक्षणे नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

कोरोना संशयितांसाठी कुठे-कुठे होणार चाचणी?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कोवीड -19 उपाययोजना अधिसूचना लागू झाल्याने आवश्यकता भासल्यास विलगीकरणासाठी खाजगी रुग्णालयातील बेडस् अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मुंबई येथील कस्तुरबा गांधी रूग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी बुधवारपासून यंत्रणा कार्यान्वित होणार असून येथे दिवसाला 350 चाचण्या करता येतील. यासोबतच के.ई.एम. रुग्णालयात दिवसाला 250 चाचण्या होतील अशी यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. सोबतच 15 ते 20 दिवसात जे.जे. रुग्णालय, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुणे येथील बीजे महाविद्यालयात चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील शाळा, महाविद्यालये, मॉल यासोबत आता पुरातन वस्तू संग्रहालये बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलाव्यात, असे आयोगाला कळविण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सध्या 33 रूग्ण आढळून आले आहेत. संशयित रूग्णांच्या चाचण्यांसाठी येत्या काही दिवसात राज्यभरातील धुळे, औरंगाबाद, मिरज, सोलापूर या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि संसर्ग टाळण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. गरजेनुसार प्रवास करण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार नागरिकांना केले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी निजर्तुंकीकरण करण्याकरिता संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये आवश्यकता भासल्यास कोरोनाच्या रूग्णांवर उपचारासाठी 450 व्हेंटिलेटर स्वतंत्ररित्या ठेवण्यात आले आहेत. गरज पडल्यास खाजगी रूग्णालयाकडून व्हेंटिलेटर घेण्यात येतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

काल रात्री पिंपरी चिंचवड येथील 5 आणि आज सकाळी औरंगाबाद येथील 1 रुग्ण कोरोनाबाधित आला. तसंच सायंकाळी पिंपरी चिंचवडमधीलही एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 33 झाली असून औरंगाबाद मधील रुग्णालयात भरती असलेल्या 59 वर्षीय महिलेने रशिया आणि कझाकिस्तान येथे प्रवास केलेला आहे. तिची प्रकृती स्थिर आहे.

First published: March 15, 2020, 11:36 PM IST

ताज्या बातम्या