बुलडाण्यात 'कोरोना' संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

बुलडाण्यात 'कोरोना' संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. दोन दिवसांत या रुग्णाचा वैद्यकीय चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल.

  • Share this:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलडाणा, 14 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. राज्यातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर बुलडाण्यामध्ये कोरोना व्हायरसच्या संशयित 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

बुलडाण्यामध्ये विदेशातून आलेल्या एका 70 वर्षीय रुग्णावर सामान्य रुग्णालय येथील कक्षात उपचार सुरू असताना या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सकाळपासून या रुग्णावर उपचार सुरू असून कोरोना संशयित रुग्ण म्हणून त्याच्यावर उपचार केले जात होते. या रुग्णाचे  नमुने तपासणीसाठी नागपूरला  पाठवण्यात आले होते. परंतु, आज सायंकाळी साडेचार वाजेच्यादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून या रुग्णाला मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार जडले असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

चिखली येथील ७० वर्षीय व्यक्ती सौदी अरेबिया इथं 25 फेब्रुवारी रोजी गेला असता तो 13 मार्च रोजी परत आला होता.  बुलडाण्यात परत आल्यानंतर त्याला ताप, सर्दी खोकला असल्याने तो बुलडाणा येथील खाजगी रुग्णालयात गेला. मात्र, तेथून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. त्याचे लक्षणे पाहता त्याला सामान्य रुग्णालयातील आय सोल्युशन वार्डमध्ये भरती करण्यात आले  होते. आज सकाळपासून त्याच्यावर कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून उपचार सुरू होते. सोबतच त्याला इतरही आजार जडले होते. त्याचे नमुने हे नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परंतु, उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. दोन दिवसांत या रुग्णाचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल. मात्र, त्याच्यावर कोरोना संशयित रुग्ण म्हणूनच उपचार सुरू होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.

मुंबई, पुणे नागपूरनंतर यवतमाळमध्येही 'कोरोना', राज्यातील रुग्णांची संख्या 22 वर

राज्यातील कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगरपाठोपाठ आता यवतमाळमध्येही (yavatmal) कोरोनाव्हायरस पोहोचला आहे. यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे.

यवतमाळमध्ये कोरोनाव्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत. हे दोघंही दुबईला गेलेत. या रुग्णांनंतर आता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 22 वर पोहोचला आहे.

राज्यात कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला होता. आतापर्यंत पुण्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 10 रुग्ण आहेत. तर नागपूर आणि मुंबईत प्रत्येकी 4, ठाणे आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. पुण्यातील दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.

 राज्यातल्या सगळ्या शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर

कोरोना व्हायरस (Coronavirus) राज्यातील सगळ्या शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं आहे. सोमवारपासून पुढची सूचना मिळेपर्यंत 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.शासनाच्या, महापालिकेच्या आणि खासगी शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत.

दहावी बारावीच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील. यापूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

First published: March 14, 2020, 6:41 PM IST

ताज्या बातम्या