मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोना काळात 18 मंत्र्यांचे खासगी रुग्णालयात उपचार, तब्बल 1 कोटी 40 लाखांचे बिल सरकारच्या माथी

कोरोना काळात 18 मंत्र्यांचे खासगी रुग्णालयात उपचार, तब्बल 1 कोटी 40 लाखांचे बिल सरकारच्या माथी

Hospital Representative Image

Hospital Representative Image

राज्य सरकारमधील मंत्र्यांचाच कोरोना संकट काळात सरकारी यंत्रणा आणि सरकारी रुग्णांलयांवर विश्वास नव्हता का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्याला अगदी तसंच साजेसं कारण आहे.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 21 एप्रिल : राज्यात गेल्या दोन वर्षात कोरोनाने (Corona) प्रचंड थैमान घातलं. या दोन वर्षात कोट्यवधी नागरिकांना कोरोनाची लागण झाली. या काळात राज्य सरकारकडून (Maharashtra Government) ठिकठिकाणी कोविड सेंटरद्वारे (Covid Care Center) उपचार देण्यात आले. राज्य सरकारने आरोग्य सेवेसाठी चांगले प्रयत्नही केले. पण राज्य सरकारमधील मंत्र्यांचाच सरकारी यंत्रणा आणि सरकारी रुग्णांलयांवर विश्वास नव्हता का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्याला अगदी तसंच साजेसं कारण आहे. कारण कोरोना संकट काळात तब्बल 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी एकाही मंत्र्याने राज्य सरकारच्या कोविड सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात उपचार घेतले नाही. अर्थात आपल्यावर उपचार कुठे घेण्यात यावेत, याबाबत निर्णय घेण्याचा त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण या 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखो रुपयांचे बिल हे सरकारच्या माथी टाकलं. या 18 मंत्र्यांच्या बिलाची एकूण रक्कम ही तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये इतके आहे. सर्वसामान्य माणूस मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या डोंबिवली, कल्याण, बदलापूर, वसई-विरार सारख्या ठिकाणी 20 लाखांचं घर घेण्यासाठी आख्खं आयुष्य वेचतो. पण इथे मंत्र्यांच्या नुसता उपचाराचा खर्च तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये खर्चाचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडल्याची माहिती माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात संयमाने काम केलं. पण या संकट काळात लढत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेचं नेतृत्व केलं. पण या शासकीय यंत्रणेवर आरोग्य मंत्र्यांचा विश्वास नव्हता का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. कारण ज्या 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत त्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे राजेश टोपे यांचं खासगी रुग्णालयाचं बिल सर्वाधिक 34 लाख 40 हजार रुपये इतकं आलं आहे.

(तुम्हालाही Typing येत असेल तर संधी सोडू नका; MPSC तर्फे 'या' पदांसाठी भरतीची घोषणा; करा अर्ज)

18 मंत्र्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश?

'झी 24 तास'ने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री राजेश टोपे (बिल 34 लाख 40930), ऊर्जामंत्री नितीन राऊत (बिल 17 लाख 63,879), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (बिल 14 लाख 56,604), महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( बिल 12 लाख 56,748), गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (बिल 11 लाख 76,278), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (बिल 9 लाख 3,401), पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (बिल 8 लाख 71,890), जलसंपदामंत्री जयंत पाटील (बिल 7 लाख 30,513), उद्योगमंत्री सुभाष देसाई ( बिल 6 लाख 97,293), परिवहन मंत्री अनिल परब (बिल 6 लाख 79,606) यांचा समावेश आहे. तसेच दोन लाखांपर्यंत उपचार घेतलेल्या मंत्र्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तर एक लाखापर्यंत उपचार घेतलेल्या मंत्र्यांमध्ये आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचा समावेश आहे. तर 50 हजारच्या जवळपास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपचार घेतले आहेत.

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

दरम्यान, राज्यातील 18 मंत्र्यांनी तब्बल 1 कोटी 40 लाखांचे उपचार खासगी रुग्णालयात घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "कारोना काळात मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो नव्हतो. मी घरात होतो. गेल्यावर्षी रुग्णालयात दाखल झालो तेव्हा मला हृदय विकाराशी संबंधित त्रास होता. त्यामुळे दाखल झालो होतो. पण मी कोरोनामुळे दाखल झालो नव्हतो", अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

First published: