सांगली, 02 मे : कोरोना व्हायरसनं जगभर थैमान घातलं आहे. चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती आहे. भारतातही आता तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. 4 मेपासून 17 मेपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. लोकांना घराबाहेर पडण्यास, कार्यक्रम घेण्यास, गर्दीच्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. यामुळे यंदाच्या लग्नसराईवरही परिणाम झाला आहे. ठरलेली लग्नं पुढं ढकलावी लागली आहेत.
लॉकडाऊनमुळे लग्न पुढं ढकलेले चंद्रपूरचे वन अधिकारी राहुल पाटील यांनी लग्नाच्या ठरलेल्या तारखेला कोरोनाच्या लढ्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आयएफएस राहुल पाटील यांचा विवाह तेजस्वीनी साळुंखे यांच्याशी ठरला आहे. 2 मे 2020 रोजी म्हणजे आजच त्यांचं लग्न होणार होतं. मात्र कोरोनामुळे लग्नं पुढे ढकलण्यात आलं. लग्नाची ठरलेली तारीख खास ठरावी यासाठी त्यांनी कोरोनाच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची मदत केली आहे.
आज 2 मे ही माझ्या लग्नाची तारीख होती ,अस म्हणतो कारण आता करोना चे थैमान आपण सारे जाणतोच आहोत या तारखेची आठवण म्हणून आम्ही हा दिवस वेगळ्या प्रकारे साजरा करणार आहोत.मी आणि माझी भावी पत्नी तेजस्विनी साळुंखे आम्ही 1 लाख रुपये महाराष्ट्र CM रिलीफफंड छोटीशी मदत🙏 @CMOMaharashtrapic.twitter.com/dbCjusq4YN
राहुल पाटील यांनी म्हटलं की, आज 2 मे ही माझ्या लग्नाची तारीख होती ,अस म्हणतो कारण आता करोनाचे थैमान आपण सारे जाणतोच आहोत. या तारखेची आठवण म्हणून आम्ही हा दिवस वेगळ्या प्रकारे साजरा करणार आहोत.मी आणि माझी भावी पत्नी तेजस्विनी साळुंखे आम्ही 1 लाख रुपये महाराष्ट्र CM रिलीफफंड छोटीशी मदत करत आहोत.
कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि प्रशासन अहोरात्र झटत आहे. कोरोना रुग्णांची सेवा करत असताना कुटुंबापासून दूरही रहावं लागत आहे. यांच्यासाठी सर्वच स्तरातून मदत पोहोचवली जात आहे. राहुल पाटील यांनी आणखी काही सहकाऱ्यांसह सांगली जिल्ह्यातील बिळाशी इथं 5 हजार मास्कचे वाटप केले होते.