भिवंडी, 29 ऑक्टोबर: राज्यावर आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा व्यवसाय बुडाला, बहुतेकांच्या नोकऱ्या गेल्या. परिणामी अनेकांवर उपासमारीची वेळ आली. शेतकरी, व्यापारी, हॉटेल, बार, रेस्ट्रॉरंट व्यावसायिकांनाही लॉकडाऊनचा फटका बसला. मात्र, असं म्हणतात की, वाईट गोष्टीच्या मागे एक चांगली गोष्ट दडलेली असते. भिवंडी शहरातही असंच काहीसं घडलं आहे.
भिवंडी शहरातील पद्मानगरात गेल्या 20 वर्षांपासून सुरु असलेला ममता बार आणि रेस्ट्रॉरंट बंद करून तिथे 25 बेडचे भव्य स्नेजोस मल्टिस्पेशालीटी हॅास्पिटल सुरू करण्यात आलं आहे. बिअर बार मालकांच्या या आदर्श निर्णयामुळे परिसरातील दोन लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा... कोजागिरीच्या रात्री दिसणार BLUE MOON; पुन्हा 3 वर्षांनंतरच येणार असा योग
आबासाहेब निंबाळकर मानव विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब राजे निंबाळकर यांनी 20 वर्षे जुना ममता बार आणि रेस्ट्रॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर बार असलेल्या जागेत निंबाळकर यांनी स्नेजोस मल्टिस्पेशालीटी हॅास्पिटल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी हे मल्टिस्पेशालीटी हॅास्पिटल नागरिकांच्या सेवेत असणार आहे.
या हॅास्पिटल स्पेशालीटीमध्ये मोफत रुग्णवाहिका सेवा, जिनेकोलॉजिकल शस्त्रक्रिया, लॅपरोस्कोपिक सर्जरी, कान, नाक, घसा तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, फिजिओथेरपी, मधुमेह आदी सुविधा मिळणार आहे. या स्नेजोस - मल्टिस्पेशालीटी हॅास्पिटलचं उद्घाटन शुक्रवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फेरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. तर महापौर प्रतिभा विलास पाटील फित कापून, नारळ वाढवून हॉस्पिटल सुरु करणार आहे.
हेही वाचा..यांना आवरा! दारुचे बॉक्स असलेल्या गाडीला अपघात, तळीरामांनी लंपास केल्या बाटल्या
या हॉस्पिटलमध्ये 25 बेड असून डॉ. समीर लटके, डॉ. तृप्ती दिनकर, डॉ. पुनीत कुमार गुप्ता, डॉ. श्यामसुंदर वर्मा, डॉ. शशिकांत मशाल, डॉ. स्नेहा वाघेला, डॉ. शिवरंजनी पुराणिक, डॉ. शाहिस्ता मन्सुरी अशी 10 डॉक्टरांची टीम असून 18 स्टाफ राहणार आहे. सर्व सुविधा असणाऱ्या या हॉस्पिटलमुळे परिसरातील तब्बल दोन लाख नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.