ऑक्सिजन, लशींच्या पुरेशा साठ्यासाठी टोपेंचे पुन्हा केंद्राकडे आर्जव, Remdesivir बाबतही तक्रारीचा सूर

ऑक्सिजन, लशींच्या पुरेशा साठ्यासाठी टोपेंचे पुन्हा केंद्राकडे आर्जव, Remdesivir बाबतही तक्रारीचा सूर

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा केंद्राकडे (Center) ऑक्सिजन, लस आणि रेमडेसिविर (Oxygen, Vaccines, Remdesivir) सारख्या औषधांच्या पुरेशा पुरवठ्याची मागणी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मे : कोरोना (Coronavirus) विरोधातील युद्धामध्ये आवश्यक असलेल्या शस्त्रांच्या तुटवड्यावरून केंद्र आणि राज्यातील वाद काही संपण्याची चिन्हं नाहीत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा केंद्राकडे (Center) ऑक्सिजन, लस आणि रेमडेसिविर (Oxygen, Vaccines, Remdesivir) सारख्या औषधांच्या पुरेशा पुरवठ्याची मागणी केली आहे. राज्याला गरज आहे त्या तुलनेत पुरवठा (supply) होत नसल्याची तक्रार टोपेंनी केली आहे.

राजेश टोपे शुक्रवारी म्हणाले की, आम्हाला 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं आम्हाला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशी विनंती असल्याचं टोपे म्हणाले. ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या मुद्द्यावरून सध्या केंद्र सरकारवर मोठा दबाव असल्याचं पाहायला मिळतंय. दिल्लीतील ऑक्सिजनच्या संकटावरून हायकोर्टानंही केंद्राला फटकारलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रानं पुन्हा एकदा पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार केली आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी घट पाहायला मिळत असल्यामुळं ऑक्सिजनसाठी राज्यात अगदीच धावपळ सुरू नसल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र तरीही पुरेसा ऑक्सिजन पुरवठा केल्यास रुग्णांवर उपचार अधिक सहज होणार आहेत.

(हे वाचा-कोरोनाला या गावकऱ्यांनी वेशीवरच रोखलं! आत्तापर्यंत एकही COVID-19 Positive नाही)

लशीच्या मुद्द्यावर बोलताना राजेश टोपेंनी सांगितलं की, आम्हाला दोन दिवसांपूर्वी 9 लाख लसींचा साठा मिळाला होता. तर आणखी 8 लाख लसी मिळणार आहेत. पण राज्याला मोठ्या संख्येनं लसींचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी राजेश टोपेंनी केंद्राकडे केली आहे. 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले सुमारे 4 लाख नागरिक दुसरा डोस मिळण्यासाठी वाट पाहत आहेत. कोव्हॅक्सिनचा पुरवठा होत नसल्याचंही टोपे म्हणाले. जर आम्हाला लसींचा साठा मिळाला नाही तर 18-44 वयोगटासाठी राखीव असलेला लसींचा साठा 45 आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी वापरावा लागेल असंही टोपे म्हणाले.

(हे वाचा-कोरोना नियमांना तिलांजली देत नागपुरात काढली लग्नाची वरात; 50 हजाराचा दंड)

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या परवानगीनंतर रेमडेसिव्हीरचा तुटवडा कमी व्हावा यासाठी 3 लाख रेमडेसिविर आयात करण्यास सुरुवात केली असल्याचं टोपेंनी सांगितलं. केंद्राकडून ठरवून दिलेला रेमडेसिव्हीरचा साठाही मिळत नसल्याचं टोपे म्हणाले. आम्हाला अमेरिकेकडून आलेल्या मदतीपैकी 52 हजार रेमडेसिव्हीर मिळाले, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत काहीशी घट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. तसंच भविष्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळं अशाप्रकारे कोरोना विरोधातील लढ्यात शस्त्रंच हाती नसली तर लढायचं कसं हा प्रश्न आहे. त्यामुळं केंद्र आणि राज्यानं लवकरात लवकर यावर समन्वयानं तोडगा काढणं गरजेचं आहे.

Published by: News18 Desk
First published: May 7, 2021, 5:18 PM IST

ताज्या बातम्या