Home /News /maharashtra /

कोरोना झालेल्या लेकरांना उपचारासाठी सोपवलं, मन हेलावून टाकणारा प्रसंग

कोरोना झालेल्या लेकरांना उपचारासाठी सोपवलं, मन हेलावून टाकणारा प्रसंग

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कर्मचारी सगळ्यांना धीर देत असले तरी त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा मास्क लावल्यामुळे दिसल्या नाहीत.

औरंगाबाद, 16 मे : औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांमध्ये 1 ते 8 वर्षीय बालकांचेही प्रमाण वाढत आहे. शहरातील पुंडलिक नगर भागातही काही लहान बालक कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे कोरोनाची बाधा झालेल्या बालकांच्या पालकांचा काळजाचा ठोका चुकला. त्यांना माहीत होतं आपल्याला आता पुढचे काही दिवस मुलांच्या सोबत राहता येणार नाही. पालकांनी आपापल्या बालकांच्या बॅग भरायला सुरुवात केली. काहीही न कळण्याच्या वयात बालकांना काय चाललंय हे कळत नव्हत. कोरोना काय आहे? आपल्याला नेमकं झालं काय? आपल्याला कुठं नेणार ? असे अनेक प्रश्न मुलांच्या चेहऱ्यावर होते. आपापल्या पालकांचे चिंताग्रस्त चेहरे बघून मुलंही रडू लागली. शेवटी पुंडलिक नगरमध्ये पांढरे किट घालून आरोग्य विभागाचे कर्मचारी हातात कॊरोना पॉझिटिव्ह रुग्णांची यादी घेऊन आले. कोरोना पॉझिटिव्ह बालकांना घेऊन त्यांचे पालक रांगेत उभा राहिले. तेवढ्यात पॉझिटिव्ह रुग्णांना घेऊन जाणारी बस आली आणि पालकांच्या डोळ्यात असावं ओघळू लागली. आरोग्य विभागाचे कर्मचारी यादीतील नावं वाचून एकएकाला गाडीमध्ये बसवू लागले. शेवटी पालकांनी मन घट्ट करून भरलेल्या बॅगसहित आपापल्या मुलांना गाडीत बसवले. निष्पाप मुलांना बॅग घेऊन गाडीत चढतांना बघून उपस्थित गल्लीतील नागरिकांना भावना अनावर झाल्या. अनेकांनी अश्रूंद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शेवटी उपस्थित पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना धीर देत म्हटलं की, कोरोना मधून अनेक जण आता बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे घाबरू नका. तुमची मुलं नक्की बरे होऊन परत येतील. आम्हालाही मुलं आहेत. आम्ही त्यांची काळजी घेऊ. कर्मचारी सगळ्यांना धीर देत असले तरी त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा मास्क लावल्यामुळे दिसल्या नाहीत. तिकडे बसमध्ये थांबलेल्या त्या निष्पाप बालकांच्या मनात किती काहूर माजलं असले. कारण त्याला कोरोना माहीत नाही...लॉकडाऊन काय माहीत नाही...त्यांच्या मनात हा विचार असावा...आई बाबा शाळेतील बसमध्ये सोडण्यासाठी हसत येतात, आज मात्र ते का रडत आहेत? संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या