आमच्या नेत्याचा फोटो का नाही? सोलापुरात जयंत पाटलांच्या समोरच काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ, VIDEO

सभेच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या पोस्टरवर 'महाविकास आघाडीची प्रचार सभा' असं लिहिण्यात आले होते. पण, व्यासपीठावरील पोस्टरवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो पोस्टवर नव्हता.

सभेच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या पोस्टरवर 'महाविकास आघाडीची प्रचार सभा' असं लिहिण्यात आले होते. पण, व्यासपीठावरील पोस्टरवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो पोस्टवर नव्हता.

  • Share this:
सोलापूर, 22 नोव्हेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार (mva government) स्थापन केले. पण, स्थानिक पातळीवर तिन्ही पक्ष कुठे एकत्र येत आहे, तर कुठे धुसफूस पाहण्यास मिळत आहे. सोलापूरमध्ये (Solpaur) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासमोरच काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. सोलापूर शहरात पदवीधर आणि शिक्षक आमदारकीच्या निवडणूक (Graduate and Teacher Constituency Elections) प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. तसंच, उदय सामंत, बंटी पाटील, दत्तात्रय भरणे इत्यादी मंत्रीही हजर होते. महाविकास आघाडीची सभा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पण, अचानक या सभेत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. सभेच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या पोस्टरवर 'महाविकास आघाडीची प्रचार सभा' असं लिहिण्यात आले होते. पण, व्यासपीठावरील पोस्टरवर  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो पोस्टवर नव्हता. तसंच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा हा मतदारसंघ असून त्यांचाही फोटो नव्हता, त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच संतापले होते. त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेऊन जोरात घोषणाबाजी केली.  त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून महिला कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, 'महाविकास आघाडी म्हणता आणि आमच्याच नेत्याचा फोटो का नाही लावला?' असा सवाल करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजकांना चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध निषेध म्हणत सभा मंडपात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ कार्यक्रम हा थांबवण्यात आला होता. आपल्या नेत्याचा फोटो न लावण्यात आल्यामुळे काही नाराज कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवून सभा मंडपातून बाहेर पडण्याचे पसंत केले. अखेर, कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जाहीर माफी मागण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षांनी व्यासपीठावरून कॉंग्रेस कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागितली. रविवारी असल्यामुळे अचानक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याधिकाऱ्यांकडून एका दिवसांत परवानगी घेण्यात आली. त्यामुळे या धावपळीत फोटो लावण्यास विसरल्याची कबुली राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षांनी दिली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध मावळला. अर्धातासाच्या गोंधळानंतर कार्यक्रमाला पुन्हा एकदा रितसर सुरुवात झाली.
Published by:sachin Salve
First published: