काँग्रेसमध्ये राडा, प्रणिती शिंदेंसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिले सामूहिक राजीनामे

काँग्रेसमध्ये राडा, प्रणिती शिंदेंसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिले सामूहिक राजीनामे

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांचे समर्थक कमालीचे नाराज आहे.

  • Share this:

सोलापूर, 31 डिसेंबर : महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक असलेले नेते नाराज झाले आहे. नाराज नेत्यांच्या समर्थकांचा एकच उद्रेक झाला आहे. तर ठिकठिकाणी राजीनामा सत्र सुरू झाले आहे. सोलापुरातही  शहर आणि ग्रामीण कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे.

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांचे समर्थक कमालीचे नाराज आहे. त्यामुळेच शहरातील युवक प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले यांनी आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे.

तसंच युवक आणि विद्यार्थी कॉंग्रेसच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांसह पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांनी  राजीनामे दिले आहे.

सोनिया गांधींना लिहिले रक्ताने पत्र

आमदार प्रणिती शिंदेंवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी चक्क स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून ते काँग्रेसच्या अध्यक्षा  सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पाठवलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी सुशिलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे योगदान असतानाही त्यांना मंत्रिमंडळातून का डावल्यात आलं?  असा प्रश्न ही त्यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

 संग्राम थोपटेंच्या  समर्थकांनी पुण्यात काँग्रेस भवन फोडलं

काँग्रेसभवनातील सर्व खुर्चा, टेबल, दरवाजे कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आले आहेत. अजूनही कार्यकर्ते भवनात असून याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते कारवाई करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 'गेली 50 वर्ष थोपटेंनी या मतदारसंघात पक्षाला मोठं केलं. ग्रामीण भागात काम करून पक्षाला वर आणलं. त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी पक्षासाठी कामं केलं. अनेकदा निवडूण येऊनही त्यांनी पक्ष सोडला नाही. पण तरीदेखील त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही कोणीही शांत बसणार नाही. भविष्यात काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचा सत्कार या जिल्ह्यात होणार नाही' आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

कोल्हापुरातही काँग्रेस नेते नाराज

दरम्यान, नाराजी नाट्य कोल्हापुरात देखील पाहायला मिळतंय. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि पी. एन. पाटील यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर पक्षांना मंत्रिपदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात पक्षश्रेष्ठींनी टाकली. यामुळं पी.एन.समर्थक नाराज आहेत. गेली चाळीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आमदार पी. एन. पाटील यांच्या पक्ष निष्ठेचं हेच फळ का? असा सवाल करत पक्षनिष्ठेची नियमावली सांगा आणि त्यात आम्ही कुठे कमी पडलो हे देखील दाखवून द्या असा आक्रमक पवित्रा पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी घेतलाय.

तसंच पी.एन. समर्थकांचा बुधवारी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पक्षात राहण्याबद्दल आमदार पी. एन. पाटील(P. N. Patil) यांना फेरविचार करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होऊ शकतो. असं असलं तरी पक्षावर नाराज असलेल्या पी. एन. पाटील यांनी सध्या तरी या सगळ्या प्रकारावर मौन बाळगलंय. तसं झालं तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो. त्यामुळे पाटील यांच्या 1 जानेवारीला होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यावर सर्वांचं लक्ष लागलंय.

शिवसेनेतही असंतोष

ठाकरे सरकार हे महाविकास आघाडीचं असल्याने मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या आहेत. इच्छुकांची जास्त असलेली संख्या आणि वाट्याला कमी आलेली मंत्रिपदं यामुळे अनेक इच्छुकांना नाराज व्हावं लागलं. विदर्भात शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे मतभेद आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी संजय राठोड यांना भावना गवळींना तिकीट मिळू नये यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना तिकीट दिलं आणि त्या निवडूनही आल्यात.

मंत्रिडळ विस्तारात पश्चिम विदर्भातून एकाला मंत्रिपद मिळावं अशी मागणी खासदार गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली होती. बुलडाण्याचे शिवसेना नेते संजय रामुलकर आणि अकोल्याचे संदीप बाजोरीया यांना मंत्रिपद द्यावं अशी त्यांची मागणी होती. मात्र, दिग्रसचे आमदार संजय राठोड यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात स्थान तर दिलंच त्याचबरोबर बढतीही दिली. त्यांना राज्यमंत्रिमंडळातून थेट कॅबिनेटमंत्रिपद दिलं. त्यामुळे गवळी नाराज झाल्या आहेत.

राष्ट्रवादीतही नाराजी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. मंत्रिपदासाठी संधी न मिळालेले माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोलंकी हे राजीनामा देण्याच्य तयारीत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या सगळ्याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2019 07:20 PM IST

ताज्या बातम्या