सागर सुरवसे, प्रतिनिधीसोलापूर, 02 जानेवारी : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनाही स्थान मिळालं नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते अजूनही नाराज आहेत..त्यामुळे मागच्या 2 दिवसानंतरही सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरूच आहेत.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्यावरून काँग्रेसमधील घोळ अखेरच्या क्षणापर्यंत सुरू होता. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कुणीही नाराज होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींकडून काळजी घेण्यात आली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उफाळून आली.
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्या नाराज आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांची नाराजी उघड झाली. सलग तीन वेळा आमदार झालेल्या प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानं त्यांच्या समर्थकांनी धरणं आंदोलन केलंय.
एवढचं नाही तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही करण्याचा इशारा दिलाय. तसंच प्रणिती यांच्या समर्थकांनी सोलापूर काँग्रेस भवनाचं गेट बंद करून तिथेच धरणं धरलंय.
प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद देण्यासाठी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी चक्क रक्तानं पत्र लिहलंय. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना रक्तानं पत्र लिहून प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रणिती शिंदे यांना मंत्री करण्याच्या मागणीसाठी सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत. काँग्रेसच्या 50 पेक्षा अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची दखल घेणार का हेच आता पाहावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.