मुंबई, 13 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर आता काँग्रेसचे पथक दुष्काळ भागाच्या पाहणी दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत. दुष्काळी दौऱ्यावर पाहणी करण्यासाठी काँग्रेसने अनेक नेत्यांकडे जबाबदारी दिली आहे. पण त्यामध्ये विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव नाही. त्यांकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
राज्यात सध्या भीषण दुष्काळाचं संकट असून दुष्काळग्रस्तांना वेळेवर आणि योग्य ती मदत पुरवण्यात भाजप-शिवसेना सरकार अपयशी ठरलं. सरकारच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत. सरकारचे हे अपयश उघडे पाडण्यासाठी आणि दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेसचं पथक दुष्काळ भागाची पाहणी करत आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली 10 मे रोजी मुंबईतील टिळक भवन इथे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन दुष्काळी समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन दुष्काळी भागाला तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली.
हेही वाचा: अहमदनगर लोकसभा निवडणूक : सुजय विखे पाटील VS संग्राम जगताप, विजय कुणाचा?
दुष्काळ भागावर पथक नेमून त्यांना दुष्काळी भागाची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रांताध्यक्षांच्या निर्देशानुसार हे दुष्काळी पाहणी दौरे सुरू करण्यात आले आहेत. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सोमवारपासून हे पाहणी दौरे सुरू करण्यात आलेत तर मंगळवारपासून इतर विभागात काँग्रेसचे पथक दौऱ्यावर जात आहे.
विदर्भ विभागात विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली, मराठवाड्यात बसवराज पाटील आणि मधुकराव चव्हाण, उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात तर पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची दुष्काळग्रस्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
या दौऱ्यावेळी चारा छावण्यांना भेटी देणं, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीचे झालेले नुकसान तसेच पिण्याच्या पाण्याची स्थिती काय आहे याची माहिती हे पथक घेणार आहे. शेतकऱ्यांशी संवादही साधला जाणार आहे, त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण यांना अहवाल सादर केला जाणार आहे.
बीड जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यात काय म्हणाले शरद पवार? पाहा हा VIDEO