सोलापूर, 12 जुलै- राज्याचे नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक दावा केला आहे. तो म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत. ते भाजप-शिवसेना युतीत प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत. या बाबत लवकरच भाजपाध्यक्ष निर्णय घेतील, असेही विखे पाटलांनी सांगितले आहे. आषाढी एकादशीनिमित्त विखे पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज आहेत. एकूण ते माझ्यासारखेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. त्यामुळे मी स्वतः भाजपमध्ये आलो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आणखी कोणी युतीत प्रवेश केला तर त्यात आश्चर्य वाटायला नकाे.
आदित्य ठाकरे यांच्याबाबत भाष्य करणं टाळलं...
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, या चर्चेवर पत्रकारांनी प्रश्न केला असता विखे पाटील यांनी भाष्य करणं टाळलं. आदित्य ठाकरे यांच्याबाबत युतीतील दोन्ही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, मी भाष्य करणं चुकीचं ठरेल, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय
मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने तूर्तास नकार दिला. मराठा समाजाचा हा विजय आहे. मराठा समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय असल्याचे मत विखे पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.
दरम्यान, कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र माझ्यासाठी मुद्दा नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला भूमिका असते, धोरण असतं. राजकीय पक्षाबाबत मी काही भाष्य करणार नाही. सध्याचे सरकार अनेक रखडलेली कामे करत आहे. सरकार सकारात्मक भूमिका घेतं, त्यामुळे सर्वांना सरकारबद्दल आकर्षण आहे, असं विखे म्हणाले.
'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल', देवकी पंडित यांच्या गाण्यातून पांडुरंगाला साद