Home /News /maharashtra /

'काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकासआघाडीबद्दल बोलतही नाहीत', शिवसेनेची खदखद पहिल्यांदाच बाहेर

'काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकासआघाडीबद्दल बोलतही नाहीत', शिवसेनेची खदखद पहिल्यांदाच बाहेर

राज्यातलं महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) पडल्यानंतर ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेना आमदाराची (Shivsena MLA) महाविकासआघाडीबद्दलची खदखद पहिल्यांदाच बाहेर पडली आहे.

    गुहागर, 5 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena) 40 आणि 10 अपक्ष अशा 50 आमदारांना घेऊन बंड केलं. शिंदे यांच्या या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातलं सरकार पडल्यानंतर ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेना आमदाराची महाविकासआघाडीबद्दलची खदखद पहिल्यांदाच बाहेर पडली आहे. फक्त शिवसेनेची मंडळी महाविकासआघाडी म्हणून बोलत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले महाविकासआघाडीबाबत शब्ददेखील बोलत नाहीयेत, अशी नाराजी शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी बोलून दाखवली. जयंत पाटील स्वबळाची भाषा करत असताना आपण स्वतंत्र का लढू शकत नाही? असा सवाल भास्कर जाधवांनी विचारला. आगामी काळात निवडणुका स्वबळावर लढवल्यास जिंकवून दाखवू, असा विश्वास भास्कर जाधवांनी व्यक्त केला. भास्कर जाधवांच्या या विधानामुळे आता ठाकरेंसोबत असलेल्या आमदाराचीही महाविकासआघाडीबद्दलची नाराजी चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला व्हिलन ठरवलं. राष्ट्रवादीने सरकारमध्ये असताना निधी दिला नाही, तसंच राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. आता तर ठाकरेंसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधी महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरू असताना भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांच्याकडून शिवसेना आमदारांबाबत वापरण्यात येणाऱ्या भाषेबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी आव्हानाची नाही तर आवाहनाची भाषा गरजेची असल्याचं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या