प्रफुल साळुंखे,मुंबई 17 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली. जागावाटपाबाबत या बैठकीत फॉर्म्युला ठरणार होता मात्र त्याबाबत अजुन निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. घटक पक्षांनी जागांची मागणी केल्याने त्यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसेबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांनी आपल्या दिल्ली भेटीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे मनसेचा आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. पण आजच्या महत्त्वाच्या बैठकीत निर्णय न झाल्यानं घोळ कायम असल्याचं बोललं जातंय.
विधानसभेच्या प्रत्यक्ष रणसंग्रामाला सुरुवात होण्याआधीच सत्ताधारी भाजप आणि शिवसेना हे राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण राष्ट्रवादीचे 4 विद्यमान आमदार युतीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
VIDEO: पावनखिंडीत तळीरामांना शिवभक्तांनी दिला चोप
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेनं विरोधी पक्षातील नेते आपल्याकडे खेचत मोठा विजय मिळवला. हीच रणनीती आता विधानसभा निवडणुकीतही वापरण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे चार आमदार शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात आहेत. याबाबत 'हिंदुस्तान टाईम्स' या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिलं आहे.
कोण-कोणते आमदार युतीच्या संपर्कात?
1. नगरमधील आमदार संग्राम जगताप
2. वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर
3. श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे
4. उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी
राष्ट्रवादीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
राज्य सरकारच्या विविध योजनांचा राज्यात बोजवारा उडाला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवेदनामध्ये विविध मुद्द्यांना स्पर्श करत समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. 'केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती. मात्र या योजनेचा राज्यात बोजवारा उडाला आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची ही घोषणा होती. या अनुदानाचा पहिला टप्पा म्हणून दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. ते अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत असे हे केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत किती उदासीन आहे हे यावरुन लक्षात येते,' अशी टीका करत राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.