अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण

अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण

अहमदनगर जिल्ह्यातील कॉग्रेसचे एक विद्यमान आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 3 जुलै : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राजकीय नेतेही यापासून वाचू शकले नाहीत. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील कॉग्रेसचे एक विद्यमान आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. सदर आमदाराची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केली असता कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आमदारालाच कोरोनाची लागण झाल्याने संपर्कात आलेल्या इतरही काही व्यक्तींनी कोरोना संसर्ग झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या काँग्रेस आमदारावर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

राज्यातील अनेक मंत्र्यांनाही झाली होती लागण

राजकीय नेत्यांमध्ये राज्यात सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांच्या उपचारानंतर जितेंद्र आव्हाड या संकटातून सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

अशोक चव्हाण हे उपचारासाठी नांदेडहून मुंबईत दाखल झाले. यशस्वी उपचारानंतर तेही पुन्हा सुखरूप घरी परतले. त्यानंतर कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्या धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची बाधा झाली. सुदैवाने मुंबईतील एका रुग्णालयातील 11 दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडे यांनीही कोरोनावर मात केली.

संपादन - अक्षय शितोळे

First published: July 3, 2020, 10:46 PM IST

ताज्या बातम्या