मुंबई, 15 जुलै : काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर हे त्यांच्या विविध विषयांवरील व्याख्याने आणि लेखनामुळे अनेकदा चर्चेत असतात. आताही शशी थरूर यांचा एक व्हिडिओ महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल होत आहे. कारण यामध्ये थरूर यांनी मराठा साम्राज्याविषयी भाष्य केलं आहे.
'भारतात इंग्रजांचं राज्य नसतं तर आता भारताची स्थिती काय असती,' असा प्रश्न एका कार्यक्रमादरम्यान शशी थरूर यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शशी थरूर म्हणाले की, 'मराठ्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात साम्राज्यविस्तार केला होता. अगदी तंजावरपर्यंत मराठ्यांचं राज्य पोहोचलं होतं. त्यामुळे जर भारतात इंग्रजांचं राज्य आलं नसतं तर मराठ्यांचं साम्राज्य निर्माण झालं असतं.'
'शिवाजी महाराज-ग्रेट मराठा किंग'
या कार्यक्रमादरम्यान मराठा साम्राज्याबद्दल भाष्य करताना शशी थरूर यांनी शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशकतेच्या विचारांचं कौतुक केलं आहे. थरूर म्हणतात, 'भारतात मराठा साम्राज्य असतं तर देशात धार्मिक सहिष्णुतेचं वातावरण तयार झालं असतं. कारण ग्रेट मराठा किंग शिवाजी महाराज यांचा असा विचार होता की, युद्धादरम्यान एखादं कुराण सापडलं तर ते एखाद्या मुस्लीम व्यक्तीच्या हाती देईपर्यंत ते कुराण व्यवस्थित ठेवलं पाहिजे.'
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केल्यानंतर आता तो प्रचंड वेगान व्हायरल होत आहे.