मुंबई, 26 ऑगस्ट: भारतीय जनता पक्षाचे आमदार विनायक मेटे यांच्या नसत्या उठाठेवींमुळे मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात बालंट ओढवलं असतं, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
हेही वाचा..राष्ट्रवादीमुळे शिवसैनिकांवर अन्याय, राजीनामापत्रात खासदाराची व्यथा
यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याच्या मागणी संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना आमदार विनायक मेटे यांच्या वतीने 102 व्या घटना दुरूस्तीला आव्हान देणारी याचिका विचारात घेण्याची विनंती करण्यात आली. परंतु, या याचिकेचा आजच्या सुनावणीशी काहीही संबंध नसून, ही याचिका या प्रकरणाला जोडण्याची मागणी कोर्टानं फेटाळून लावली.
याविषयी सावंत पुढे म्हणाले की, 102 व्या घटना दुरूस्तीसंदर्भात मुंबई हाय कोर्टात पुरेसा उहापोह झाला आहे. यावरून घेण्यात आलेले आक्षेप नाकारून हाय कोर्टानं मराठा आरक्षण वैध ठरवले आहे. या पार्श्वभूमिवर मेटे यांनी या विषयावर याचिका दाखल करून ती मराठा आरक्षणाच्या प्रकरणाशी जोडण्याची मागणी म्हणजे मराठा आरक्षणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे.
हेही वाचा..खड्ड्यावरून रंगला वाद, मनसे आमदाराची शिवसेना खासदारावर 'चिखलफेक'
मागील तीन दिवस आमदार विनायक मेटे नवी दिल्लीत आहेत. त्यांनी नेमक्या कोणाच्या इशाऱ्यावरून आणि कोणत्या हेतूने मराठा आरक्षणविरोधी भूमिका घेतली, ते स्पष्ट केले पाहिजे. केवळ श्रेयवादासाठी ते हे उद्योग करत असतील तर त्यांनी आपली कोणती कृती आरक्षणाला पोषक ठरेल आणि कोणती मारक ठरेल, याचा सारासार विचार करावा, असेही खडे बोल सचिन सावंत यांनी सुनावले आहेत.