देवेंद्र फडणवीसांनी 'तो' VIDEO शेअर केल्याने पृथ्वीराज चव्हाण भडकले, जोरदार टीका

देवेंद्र फडणवीसांनी 'तो' VIDEO शेअर केल्याने पृथ्वीराज चव्हाण भडकले, जोरदार टीका

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 18 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (citizenship amendment bill 2019) देशभरात गदारोळ सुरू आहे. अनेक विद्यापीठांतील तरूण या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. विविध राज्यांतील विद्यार्थी सरकारविरोधात आक्रमक आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातही आता या कायद्यावरून रान पेटण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर याच आंदोलनासंदर्भातील एका व्हिडिओवरून निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काही विद्यार्थी 'हिंदुओं की कबर खुदेगी' असे नारे देताना दिसत आहेत. तसंच या व्हिडिओवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. 'अशा आंदोलनांना प्रोत्साहन देऊन शिवसेनेनं आता स्पष्ट केलं आहे की वैयक्तिक लोभांच्या बाबतीत तडजोडी करण्यास शिवसेना किती प्रमाणात खाली उतरली आहे', असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या याच व्हिडिओवरून पृथ्वीराज चव्हाण संतापल्याचं पाहायला मिळालं. एका फॅक्ट चेकिंग वेबसाईटने हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे. याच वेबसाईटचा आधारे घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

'नैराश्यातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बनावट व्हिडिओ शेअर करत आहेत, हे पाहून वाईट वाटलं. त्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे. माजी गृहमंत्री आणि जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी द्वेषपूर्ण आणि बनावट माहिती पसरवणं टाळलं पाहिजे,' असं ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 11:16 AM IST

ताज्या बातम्या