भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला मोठा धक्का

भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला मोठा धक्का

आमच्यासमोरही इतर पर्याय आहेत, असं म्हणत भाजपला आव्हान देणाऱ्या शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 31 ऑक्टोबर : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेनेला धक्का बसला आहे. कारण शिवसेनेबरोबर जाण्यास काँग्रेस हायकमांड फार उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आमच्यासमोरही इतर पर्याय आहेत, असं म्हणत भाजपला आव्हान देणाऱ्या शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे.

सत्तेसाठी शिवसेनेला थेट कुठलीही मदत नको, अशी भूमिका काँग्रेस हायकमांडने घेतल्याची माहिती आहे. एकूणच सेनेबरोबर जाण्यास काँग्रेस नेतृत्व सकारात्मक नसल्याचं चित्र आहे. तसंच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्येही या मुद्द्यावरून मतभेद असल्याचं दिसत आहे. अस असलं तरीही अनेक काँग्रेस नेत्यांची सेनेला मदती करण्याबाबत नकारात्मक भूमिका असल्याची माहिती आहे. त्यामुळे विरोधकांच्या आधारे भाजपवर दबाब टाकण्याच्या शिवसेनेच्या इराद्यांना धक्का बसू शकतो.

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही जागा घटल्याने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीआधी ठरलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे शिवसेनेला सत्तेत समसमान वाटा मिळावा, यासाठी शिवसेना आग्रही आहे. तसंच हा वाटा न मिळाल्यास आमच्यासमोर इतरही पर्याय खुले आहेत, असंही शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसच्या आधी राष्ट्रवादीने याबाबत नकारात्मक सूर आवळला होता.

'आम्हाला सत्ता स्थापन करण्यात रस नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तो आम्ही मान्य करतो. भाजप आणि शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा,' असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास शिवसेनेला भाजपच्या अटींवर पुन्हा एकदा सत्तेत सहभागी व्हावं लागू शकतं.

VIDEO : मीरा-भाईंदरमध्ये तरुणांची गुंडगिरी, तलवारीनं दोघांवर जीवघेणा हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 01:35 PM IST

ताज्या बातम्या