...तर एक मिनिटही ठाकरे सरकारमध्ये राहणार नाही, काँग्रेस मंत्र्याचे खळबळजनक विधान

...तर एक मिनिटही ठाकरे सरकारमध्ये राहणार नाही, काँग्रेस मंत्र्याचे खळबळजनक विधान

'जर राहुल गांधी हे जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसते तर सरकार स्थापन झाले नसते.'

  • Share this:

नागपूर, 24 ऑगस्ट : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे.  सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहे. अशातच काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीला हादरा देणारे विधान केले आहे.

'गांधी घराण्यानेच नेतृत्त्व करावे. सोनिया गांधी यांनी नकार दिल्यामुळे राहुल गांधी हे नेतृत्त्व करण्यास सक्षम आहे.

मुळात राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाला होता.  उद्या जर राहुल गांधी यांनी निर्णय घेतला की, सरकारमधून बाहेर पडावे तर आम्ही बाहेर पडू' असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

तसंच, 'जर राहुल गांधी हे जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसते तर सरकार स्थापन झाले नसते. त्यांच्या सहमतीनेच सरकार स्थापन झाले आहे. उद्या जर राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे सांगितले तर आम्हाला एक मिनिटही लागणार नाही', असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

'आमच्या पक्षात लोकशाही आहे, त्यामुळे सर्वाना बोलण्याचा अधिकार आहे. मला वाटते गांधी परिवाराकडे नेतृत्व असावे, त्यांच्यातच पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता आहे. आमच्या इथे भाजप पक्षासारखी हुकुमशाही नाही. जे दोन व्यक्ती निर्णय घेतील ते स्वीकारावे लागेल', असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपला टोला लगावला.

काँग्रेसच्या राज्याच्या कार्यकारी अध्यक्ष तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली आहे.

'गांधी हे कुटुंब नव्हे तर भारताचा DNA आहे. राहुल गांधी यांनी पार्टीचे नेतृत्व करावं असे स्पष्ट मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष पदावरून चांगलच वादंग सुरू झाले आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान,  काँग्रेस कार्यकारिणीची बैठक (CWC) सुरू झाली आहे. वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बदलावा अशी पत्राद्वारे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मागणी केल्यानंतरच ही CWC ची ही बैठक होत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

Published by: sachin Salve
First published: August 24, 2020, 12:42 PM IST

ताज्या बातम्या