काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते पुन्हा आमने-सामने, बाळासाहेब थोरातांनी नवाब मलिक यांना खडसावलं

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते पुन्हा आमने-सामने, बाळासाहेब थोरातांनी नवाब मलिक यांना खडसावलं

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मलिक यांचे कान टोचले आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी तिरकस भाष्य केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मलिक यांचे कान टोचले आहेत.

'सोनिया गांधी आमच्या नेत्या आहेत आणि आघाडी सरकारच्या मार्गदर्शक आहेत. मध्यंतरी आम्ही दलित नेत्यांची बैठक घेतली होती त्या संदर्भातून हे पत्र आहे म्हणून हे पत्र मार्गदर्शनपर समजावं. नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, त्यांनी इतर पक्षात काय चाललंय हे बघू नये. विशेषता काँग्रेसमध्ये त्यांनी पाहू नये,' अशा आक्रमक शब्दांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्याला आक्रमक शब्दांत फटकारताना महाविकास आघाडीत तणाव निर्माण होऊ नये, याची काळजीही बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. 'आम्ही एकत्र आहोत आणि महाविकास आघाडी एकत्र काम करेल आणि व्यवस्थित चालेल याचा विश्वास आहे,' असंही थोरात म्हणाले.

सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?

सरकार स्थापन करताना दलित आणि आदिवासी विकासासाठी नियोजित कार्यक्रम करण्याचे ठरविले होते. आता त्यावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधी यांनी मांडली आहे.

अनुसूचित जाती /जमातींसाठी योजना आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सोनिया गांधी यांनी पत्रात उल्लेख केला आहे. राज्यातील सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी कमी केला गेला आहे. त्यावरूनच सोनिया गांधी यांनी भूमिका घेत आदिवासी आणि दलित समाजासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही भूमिका मांडली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 19, 2020, 8:13 PM IST

ताज्या बातम्या