हरिष दिमोटे, शिर्डी, 4 ऑक्टोबर : काँग्रेसने शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. शिर्डीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू सुरेश थोरात यांना तिकीट देण्यात आलं आहे. याआधी शिर्डी मतदारसंघात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे इथं विखे विरुद्ध थोरात अशी चुरशीची लढाई रंगणार आहे.
शिर्डी विधानसभेसाठी काँग्रेसकडून याआधी डॉ. सुधीर तांबे, डॉ. एकनाथ गोंदकर यांच्या नावांची चर्चा होती. मात्र आता सुरेश थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. स्वत: बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरेश थोरात यांनी अर्ज दाखल केला आहे. सुरेश थोरात पंचायत समीतीचे सदस्य राहिले आहेत तर त्यांच्या पत्नी जि.प सदस्या होत्या. सुरेश थोरात हे जोरवे गावचे रहिवाशी असून बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक राजकारणात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे शिर्डीत विखे विरुद्ध थोरात असा रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे.
नगरमध्ये थोरात विरुद्ध विखे संघर्ष
विधानसभा निवडणुकीआधी नगर जिल्ह्यातील ताकदवार नेते अशी ओळख असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत थोरातांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी विखेंनी प्रयत्न सुरू केले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरातांचे आणि राजकीय गुरू असलेल्या बाळासाहेब वाघ यांची घरी जाऊन भेट घेतली होतं. तसंच यावेळी विखेंनी नतमस्तक होऊन बाळासाहेब वाघ यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत थोरातांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विखे आपली सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचं स्पष्ट झालं.
राधाकृष्ण विखेंनी ही खेळी खेळल्यानंतर आता बाळासाहेब थोरातांनी पलटवार केला आहे. थोरातांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाच विखेंविरोधात मैदानात उतरवलं आहे.
काँग्रेसमध्ये असतानाही या दोघांचे राजकीय युद्ध सुरू असल्याचं अनेकदा बघायला मिळालं. मात्र आता विखेंच्या भाजपप्रवेशानंतर हे युद्ध आणखी तीव्र झालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण कुणाला शह देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा