'आम्ही नव्हे, NCP तील फूट कारणीभूत'; काँग्रेसने फोडलं राष्ट्रवादीवर खापर

'आम्ही नव्हे, NCP तील फूट कारणीभूत'; काँग्रेसने फोडलं राष्ट्रवादीवर खापर

महाराष्ट्रात राजकीय कांड झालं आहे. आमच्याकडून झालेल्या विलंबामुळे नव्हे, तर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे हे कांड झालं आहे, असं काँग्रेसचे वरीष्ठ नेते अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : सकाळी महाराष्ट्रात जे राजकीय कांड झालं ते वर्णन करायला शब्द नाहीत. आमच्याकडून उशीर झालेला नाही, राष्ट्रवादीमधल्या काही लोकांनी भाजपशी संधान बांधलं, त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असं काँग्रेसचे वरीष्ठ नेते अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची बाजू मांडताना सांगितलं. अजूनही आमचं सरकार येऊ शकतं, असं स्पष्ट करताना ते म्हणाले, "आमचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत."

रात्रीत चक्र फिरली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज दुपारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते भेटले. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. तर काँग्रेसने स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेतली.

वाचा - आमदार फोडण्याचा अजित पवारांचा असा होता प्लॅन, शरद पवारांसमोर धक्कादायक खुलासा

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांमध्ये सत्तास्थापनेची बोलणी शेवटच्या टप्प्यात आलेली असतानाच भाजपने हा धक्का दिला.

त्याविषयी बोलताना अहमद पटेल म्हणाले, "आमची कालची चर्चा चांगली झाली होती. भाजपने महाराष्ट्रात घाईघाईने शपथविधी उरकला. सरकारस्थापनेची ही रात्रीत केलेली घाई पाहूनच लक्षात येतं यात काळंबेरं आहे. हे सरकार कायद्याला धरून झालेलं नाही. आम्ही तिन्ही पक्ष मिळून फडणवीस सरकारचा पराभव करू."

वाचा - 'रात्रीस खेळ चाले', उद्धव ठाकरे यांनी भाजपला केलं 'हे' ओपन चॅलेंज!

काँग्रेसचे मुंबईतले नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेबरोबर सत्तास्थापनेला उघड विरोध केला होता.आज भाजपने अजित पवारांच्या साथीत सरकार स्थापनेचा दावा करून शपथविधीसुद्धा उरकला. त्यानंतरही निरुपम यांनी हे योग्यच असल्याची प्रतिक्रिया दिली होती. याविषयी विचारलं असता पटेल म्हणाले, "संजय निरुपम यांची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका नाही."

वाचा - अजित पवारांबद्दल काय म्हणाले शरद पवार? वाचा पत्रकार परिषदतले 10 मुद्दे

तत्पूर्वी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पत्रकार परिषद केली आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित असल्याचा दावा केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 'महाविकासआघाडी'चे सरकार येणार,असा नवा दावा केला आहे. शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. कुठलेही संकट आले तरी देखील एकत्र राहणार, आम्ही तिघे एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. या संयुक्त पत्रकार परिषदेला शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे बडे नेते देखील पत्रकार परिषदेला हजर होते.

 

First published: November 23, 2019, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading