वाद उफाळला! शिवसेना आमदाराला मतदारसंघात फिरू देणार नाही, काँग्रेसचा इशारा

वाद उफाळला! शिवसेना आमदाराला मतदारसंघात फिरू देणार नाही, काँग्रेसचा इशारा

स्थानिक पातळीवरील गणितं कधी बिघडतील याचा नेम नसतो. काँग्रेस आणि शिवसेनेत सुरू झालेल्या संघर्षावरून हेच अधोरेखित होत आहे.

  • Share this:

अंबरनाथ, 18 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी ऐतिहासिक आघाडी निर्माण झाली. मात्र स्थानिक पातळीवरील गणितं कधी बिघडतील याचा नेम नसतो. अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद झाल्याचं समोर आलं आहे. शिवसेना आमदाराला मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. पाणी प्रश्नावरून अंबरनाथच्या स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील वाद उफाळून आला आहे.

अंबरनाथ शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने काँग्रेसने आज पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. शहरातील अनेक भागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या तीव्र होत असल्याने नागरिकांना यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करताना दुजाभाव करत आहे, असा आरोप करत पाणी टाकीवर चढून काँग्रेसने पाणी पुरवठा विभागाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

शहरातील इतर समस्या नगरसेवक सोडवतात, आमदारांनी निदान पाणी प्रश्न तरी सोडवावा, मात्र निवडून आल्यानंतर आमदारांना अहंकार आल्याने त्यांना कोणाची गरज नाही, खासदार आणि पालकमंत्र्यांनी आमदारांना समज द्यावी अन्यथा मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा अंबरनाथ काँग्रेसने दिला आहे.

एकीकडे राज्यात महाविकास आघाडीत मित्र पक्ष असलेले शिवसेना,काँग्रेसचे स्थानिक पातळीवर अजूनही मनोमिलन झालेले नाही, हे यातून स्पष्ट होते आहे. दरम्यान या दोन्ही पक्षातील वाद आणखी उफळण्याची शक्यता आहे. 'हे आंदोलन शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आणि फसवं आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देयकाची थकबाकी होती, ती आज 4 कोटी 38 लाख रुपये एमआयडीसीला भरले आहे. शिवाय वाढीव 4 एमएलडी पाणीदेखील शहराला मिळणार असल्याने पाणी समस्या दूर होणार आहे. केवळ पालिका निवडणूक जवळ आल्याने शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे केलं जातं आहे,' असं अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 18, 2020, 6:22 PM IST

ताज्या बातम्या