सातारा, 23 एप्रिल: रस्त्यावर झालेले अनेक ट्रक अपघात (Truck Accident) आपण पाहिले असतील, यामध्ये कधी मृत चालकाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळते तर काहींना अजिबातच मिळत नाही. मात्र, या घटनेत साताऱ्यातील एका मृत ट्रक चालक-मालकाला नुकसान भरपाई म्हणून तब्बल 1 कोटी 15 लाख रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अपघाती मृत्युमुळे समोरच्या ट्रकचा मालक आणि विमा कंपनीकडून 81 लाख अधिक 7 टक्के दराने व्याज अशी एकूण 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने (District Court Satara) दिला आहे. ही रक्कम सातारा जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई मानली जात आहे.
मृत ट्रक चालक-मालक संजय सखाराम पवार (रा. परखंदी, ता. माण) यांच्या वारसांतर्फे नुकसान भरपाईच्या दाव्याचे काम अॅड. राजेंद्र वीर यांनी पाहिले. त्यांनी सांगितले की, संजय पवार यांनी सन 2008 मध्ये 10 चाकी कंटेनर ट्रक फायनान्स कंपनीच्या कर्जाने विकत घेतला होता. अपघात होईपर्यंत संजय यांनी दरमहा रुपये 35,000 इतका हप्ता वेळच्या वेळी फेडला होता. संजय यांचे कुटुंब कळंबोली, मुंबई येथे भाड्याच्या घरात राहत होते. संजय यांची मुले तेथेच शिक्षण घेत होती. या सर्व बाबींचा विचार करून संजय यांचे उत्पन्न दरमहा रुपये 66 हजार इतके होत असल्याने एकूण 1 कोटी 44 लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पवार कुटुंबीयांतर्फे करण्यात आली होती.
(हे वाचा - लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी; सुप्रिया सुळेंनीही केली चूक )
हा दावा करताना कंटेनर ट्रकच्या कर्ज खात्याचा उतारा, ट्रकच्या मालकीचे रस्ते वाहतूक परिवहनचे (आर.टी.ओ) दाखले इत्यादी कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. हा पुरावा आणि सर्वोच्च न्यायालयाचे व मुंबई उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिर्णय यांचा विचार करून सातारा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. पी. अभंग यांनी अंतिम निर्णय देवून वारसांना एकूण 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
(हे वाचा - लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी; सुप्रिया सुळेंनीही केली चूक)
रस्त्यावरून वाहने चालवताना रहदारीचे नियम पाळण्याविषयी लोक फारसे जागरूक नाहीत. यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशात अपघात विमा योजनांचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अनेकदा अपघात विम्यांच्या दाव्याची तसेच, ज्याच्या चुकीमुळे अपघात घडला, त्याच्याकडून नुकसान भरपाईची वसुलीची कायदेशीर प्रक्रिया किचकट असते. यात वर्षानुवर्षे निघून जातात. यानंतरही जीविताचे आणि मालमत्तेचे होणारे नुकसान आणि मानसिक त्रास भरून न येणारे असतात. यासाठी रहदारीचे नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळणे हाच चांगला उपाय ठरतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Road accidents, Satara, Satara news, Truck accident