लढाईत तो आमच्यासोबत... दुसऱ्यांदा राज ठाकरेंचा उल्लेख करत काय म्हणाले मुख्यमंत्री?

लढाईत तो आमच्यासोबत... दुसऱ्यांदा राज ठाकरेंचा उल्लेख करत काय म्हणाले मुख्यमंत्री?

कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. 'कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू,' असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधन करत असताना सर्वपक्षीय नेते आपल्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. 'राज आहे...पवार साहेब आहेत..सोनिया गांधी...अमित शहा हे सगळेच या लढाईत आपल्यासोबत आहेत,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. राज आणि उद्धव या दोन बंधूंमधील राजकीय संघर्षाची चर्चा नेहमीच होते. मात्र आता कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. कारण याआधीही कोरोनाच्या आव्हानाबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी राज मला दिलासा आणि सूचना हे दोन्ही देत असल्याचं म्हटलं होतं.

राज्यातील जनेतशी संवाद साधताना नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाराष्ट्रात अडकलेल्या सर्व कामगारांची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही काळजी करू नका. या गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असं काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. कोरोनाच्या लढ्यात पैसे इथून काढा, तिथून काढा असे सूचवत आहेत. पैसे कुठून आणि कसे काढायचे ते आम्हाला कुणी सांगू नये असा टोलाही त्यांनी लगावला. दररोज 6 ते 7 लाख मजुरांना दररोज नाश्ता आणि जेवण देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोव्हिड योद्ध्यासाठी नाव देण्याचं आवाहन केल्यानंत 21 हजार लोकांनी नावं नोंदवलं अशी माहिती त्यांनी दिली. प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी लसीचा प्रयोग करण्याची परवानगी द्यावी अशी आम्ही विनंती केंद्राला केली आहे. ती परवानगी मिळली तर प्रयोगाला सुरुवात होईल.

कोरोनानंतर आर्थिक आघाड्यांवर कसं पुढे जायचं यावर अर्थतज्ज्ञांची एक समिती तयार केली असून ती सरकारला सल्ला देणार आहे. महाराष्ट्रात 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाला प्रवेश करू दिला नाही. शेतकऱ्यांना कुणीही थांबवणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 20 तारखेनंतर काय काय सुरू करता येईल याचा सरकार अंदाज घेत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, आज कोरोनामुक्त झालेल्या दोन जणांशी बोललो. 6 महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरवलं. त्याच्या आईशी मी बोललो. त्यानंतर 83 वर्षांच्या आजीबाईंशी मी बोलललो. कोरोनावर मात करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे. ते कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांसाठी सल्ला देणार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढाई दिली आता विषाणूसोबत लढाई आहे. या लढाईत भीमसैनिकांचं योगदान आहे त्यांना धन्यवाद.

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन

वांद्र्याच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. शहा यांनी घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणे ही काळजीचं कारण आहे. अशा घटना होऊ नयेत याची दक्षता घ्या. अशा घटनांमुळे भारताची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केंद्र राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं.

या प्रकरणावर आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.

First published: April 15, 2020, 10:39 AM IST

ताज्या बातम्या