सोलापूर, 19 ऑक्टोबर : राज्यावर अस्मानी संकट कोसळले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडत नाही अशी टीका विरोधकांनी केली होती. पण, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असून तातडीने मदतकार्य करण्यास सुरुवातही केली आहे.
नुकसानग्रस्तांना धीर देत मुख्यमंत्र्यांना 10 लाखांची प्रातिनिधिक मदत दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
मुख्यमंत्र्यांचे सांगवी खूर्द येथे आगमन झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. या भागात 150 घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून 11 धनादेशांचे वाटप केले आहे. पडझड झालेल्या प्रत्येक घराला 95 हजारांची मदत देण्यात आली आहे.
अक्कलकोट, बोरी नदी, रामपूर, बोरी उमरगे या पूरग्रस्त भागांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसभर पाहणी करणार आहेत. पूरग्रस्त भागातील मदतकार्य तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ आवश्यक ते पंचनामे कागदपत्रांच्या फारशी शहानिशा न करता पूर्ण करण्याचे आदेश आधीच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. आज सोलापूर जिल्ह्याचा पूरग्रस्त भागांचा दौरा पुर्ण केल्यावर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करावी -शरद पवार
दरम्यान, 'महाराष्ट्र मोठ्या संकटाला समोर जात आहे. काही ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारला जी काही मदत करायची आहे, ती मदत करत असतो. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या या भागाची पाहणी करणार आहे. त्यांनी या भागाची पाहणी करून कर्ज काढावे आणि लोकांना या संकटातून बाहेर काढावे' अशी सूचना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.