मुंबई, 15 डिसेंबर: हिवाळी अधिवेशानात सभागृहाला संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. विशेष म्हणजे राज्यातील प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी सरकार स्वतंत्र्य निधी देणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावरुन विरोधकांना समजलं असेल की, आम्ही हिंदुत्त्व सोडलेलं नाही आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
महाराष्ट्रातील गडकिल्ले ही आपली ओळख आहे, हा प्रदेश देवदेवतांचा साधुसंतांचा आहे. प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार काम करेल. त्यासाठी वेगळा निधी राखून ठेवला जाईल. टप्प्याटप्प्यानं यांचं संवर्धनाचं काम केलं जाईल. या ठेव्याचं जतन केलं जाणार आहे. विशेष म्हणजे ते वाढवलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली.
हेही वाचा...'फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा', मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी
मुख्यमंत्री म्हणाले, विरोधाकांच्या सगळ्या आरोपांना उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. गेल्यावेळी आपण सगळे एकत्र होतो. आपण वकिलांची फौज जशीच्या तशी तयार ठेवली आहे. मराठा संघटनाशी देखील चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण हे वकिलांच्या संपर्कात आहेत. इतर समाजाचे आरक्षण कमी करणार का, अशी चर्चा काही सडक्या डोक्यातून आली आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. कोणाचंही आरक्षण कमी करणार नाही, अशा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं बोलत असल्याचंही त्यांनी सभागृहात सांगितलं.
गेल्या 5 वर्षात कुंडल्या पाहणारे आता पुस्तक वाचत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. राज्य सरकारने तरी दोन दिवसांच अधिवेशन घेतलं. केंद्र सरकारनं तर हिवाळी अधिवेशन रद्द केलं आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीका करत विरोधकांची तोंड बंद केली. कोरोना कानात नाही तर नाकात बोलतो, अशा शब्दांत विरोधकांना टोला लगावला.
हेही वाचा...मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरीनंतर बदलला शेरा, भाजप नेत्याकडून 'फाईल घोटाळा' उघड?
माझं कुटुंब माझी जबाबदारी देशातील एकमेव मोहिम आहे. महाराष्ट्रचा आरोग्याचा नकाशा तयार आहे. मृतांची संख्या आपण लपवलेली नाही. आपण जगासमोर सत्य तेच सांगितलं आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात सांगून विरोधकांची बोलती बंद केली.