• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • साईबाबा जन्मस्थानाच्या वादावरून शिर्डीमध्ये बेमुदत बंद, भाविकांची मोठी गैरसोय

साईबाबा जन्मस्थानाच्या वादावरून शिर्डीमध्ये बेमुदत बंद, भाविकांची मोठी गैरसोय

शिर्डीतील साई मंदिरात देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 • Share this:
  प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी मुंबई, 19 जानेवारी : शिर्डीत रात्रीपासून बंदला सुरुवात झाली आहे. शिर्डीमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ही महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री निर्णय घेईपर्यंत बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचं आवाहन व्यापारी वर्गाला करण्यात आलं आहे. दरम्यान, साईमंदिर सुरू राहिल तसंच साईबाबांचं भक्तनिवास आणि प्रसादालय सुद्धा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्द्ल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. यानंतरच बंद बद्दलचा पुढचा निर्णय होणार आहे. साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून जो वाद सुरू आहे, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संबंधितांशी चर्चा करणार आहेत. या मुद्द्यावर मुख्यमंमत्री शिर्डीकरांची भेट घेणार आहेत. शिर्डी आणि पाथरी प्रश्नांबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. शिर्डीकरांनी रविवारीदेखील बंदची हाक दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीमध्ये बंद पुकारला असतानाही मंदिर खुले राहील, असं साईबाबा मंदिराच्या विश्वस्तांनी शनिवारी सांगितलं. शिर्डीतील साई मंदिरात देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगलीकर यांनीा याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळातील सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्यावर हा वाद निर्माण झाला होता. काही भाविक पाथरीला साईबाबांचे जन्मस्थान मानतात तर शिर्डीतील लोकांचा दावा आहे की, साईबाबांचे जन्मस्थान अज्ञात आहे. पाथरी विरुद्ध शिर्डीकर असा वाद साईबाबांचा पाथरी गावात जन्म झाल्याचा दावा पाथरीकर करत आहेत. तर साईबाबांनी कधीही स्वतःचा धर्म, जात सांगितली नाही, जन्मस्थळ सांगितले नाही. त्यामुळे साईभक्त आणि सरकारची दिशाभूल पाथरीचे लोक करत असल्याचा आरोप शिर्डीकरांनी केला. त्यामुळे पाथरी विरुद्ध शिर्डीकर असा वाद सुरू झाला आहे. शिर्डी आणि पाथरी यांच्या वादावर अनेक चर्चा पुढे येताना पाहायला मिळत आहेत. साईबाबा नेमके कोण होते? त्यांचं जन्मस्थळ कोणतं होतं याबद्दल दावे-प्रतिदावे केले जात आहेत. 1975 रोजी ब्रिटीशांना बाबा हे स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत असावेत, असे वाटले. त्यामुळे गुप्तहेर पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. असा काही लोकांनी दावा करण्यात आला आहे. तर हा दावा खोटा असून बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम् इथे झाला असल्याचा प्रतिदावा करण्यात आला आहे. एका तामीळ चरित्रात साईबाबांचे वडील साठे शास्त्री तर आई लक्ष्मीबाई असल्याचा उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे बाबा हे गुजराती ब्राह्मण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जन्मल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही अनेकदा बाबांच्या जन्मस्थळाबद्दल दावे झाले. 1918 साली बाबांनी समाधी घेतल्यांचं सांगितलं जातं त्यावेळी त्यांच्या भक्तांनी शिर्डीत विश्वस्त मंडळ स्थापन केलं. त्यावेळी पाथरी गावातील कुणाची समावेश नव्हता. त्यांच्या सोहळ्यालाही गावातील कोणीच आलं नव्हतं. शिर्डी हेच साईबाबांचे सर्वकाही असल्याचे जगभरातील साईभक्त मानतात. त्यामुळे या दाव्यांना अर्थ राहिलेला नाही, असे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाचा अधिकृत पुरावा नाही साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचं जन्मस्थळ म्हणुन पाथरीचा विकास करण्यावर शिर्डीकरांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिर्डीकरांनी बंदचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला. साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली. मात्र आता साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना शिर्डीमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे शिर्डी आणि पाथरीतला वाद सामोपचारानं सोडवण्याची गरज आहे. साईबाबांबद्दलचा 'हा' उल्लेख खटकला साईबाबांनी हयातीत कधीही जन्मस्थळ, जात, धर्म उघड केला नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्हयातील पाथरीचा विकास करणार’ असा उल्लेख केल्याने शिर्डीकर व साईभक्त नाराज झाले आहेत. यापूर्वी राष्ट्रपतींनी साईसमाधी शताब्दी सोहळ्यात साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. यावर नाराज झालेल्या शिर्डीकरांनी थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थळाचा खुलासा केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीच थेट साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केल्याने शिर्डीकर व साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. पाथरीच्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र पाथरी या गावाचा ‘साईबाबांचे जन्मस्थान’ असा उल्लेख करणे आक्षेपार्ह असल्याचे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी लवकरच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे, असे शिर्डीकरांचे मत असल्याचे कमलाकर कोते यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे साईबाबांचे भक्त आहेत, त्यांनी शिर्डीकरांच्या या भावना जाणून घ्याव्यात, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यासंबंधीची भूमिका गावकऱ्यांनी शनिवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
  Published by:Renuka Dhaybar
  First published: