मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरीवर शेतकऱ्यांसाठी करणार मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरीवर शेतकऱ्यांसाठी करणार मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर देखील दर्शनासाठी जाणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कार्ला येथील एकवीरा देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर देखील दर्शनासाठी जाणार आहेत. शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसंदर्भात मोठी घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या निवडणुकीपूर्वी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. विधानसभा निवडणूक निकालानंतर बदललेल्या गणितानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या ऐतिहासिक आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे या नव्या सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे शिवनेरीवरून याबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारची काल (बुधवारी) मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समृद्धी महामार्गासह इतर काही योजनांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

मागील सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणूनही ओळखला जात होता. याच समृद्धी महामार्गाला अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

- राज्यातील दुय्यम न्यायालयातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता.

- महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.

- महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी.

- गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता अधिकार. अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यास मान्यता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 10:03 AM IST

ताज्या बातम्या