खेड, 19 मार्च : काहीच दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली होती, याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही जाहीर सभा झाली. या जाहीर सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत एकनाथ शिंदे यांनी मागचं सर्व उकरुन काढत ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युती असताना महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलेल्या टीकेची आठवण करत माझ्या अंगावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? असा थेट सवाल केला आहे.
तुमच्या डोक्यात पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला : मुख्यमंत्री शिंदे
तुमच्या डोक्यात पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला आणि सगळंच बिघडलं. सगळे वाईट होते ते चांगले झाले, सगळं विसरून गेलात. अशोक चव्हाणांनी शेण खाल्लं असं तुम्ही म्हणालात, मग त्यांच्या पंगतीत बसून तुम्ही काय खात आहात, सांगा? कोण कोणाला डोळा मारत होता, ते आपण पाहिलं. गळ्यात गळे घालत आहेत ते कधी गळा दाबतील कळणार नाही. त्यांचा पूर्व इतिहास तपासून बघा. आम्हाला तुम्ही मिंधे म्हणताय. एकनाथ शिंदे वफादार आहे, मी गद्दार नाही खुद्दार आहे. बेईमानी माझ्या रक्तात नाही, असं एकनाथ शिंदेंनी सुनावलं. शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं, केसेस अंगावर घेतल्या त्यांना तुम्ही गद्दार आणि खोके म्हणता, तुम्हाला बोलताना थोडंतरी काही वाटलं पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या अंगावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? असं एकनाथ शिंदे म्हणाले.
वाचा - 'सर्कशीचे शो राज्यात होतील, तेच टोमणे...', गोळीबार मैदानातून शिंदेंची ठाकरेंवर तोफ!
येत्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडीच्या राज्यभरात सभा होणार आहेत, यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. सर्कशीप्रमाणे राज्यभरात त्यांचे शो होणार आहेत. तेच टोमणे, तेच आरोप तेच रडगाणं, फक्त जागा बदलत जाईल. त्यांच्याकडे खोके-गद्दार हेच दोन शब्द आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
गद्दारी 2019 ला झाली : एकनाथ शिंदे
'याच सभेने तुम्हाला उत्तर दिलं आहे. कोकणी माणूस बाळासाहेबांच्या, शिवसेनेच्या आणि धनुष्यबाणाच्या पाठीशी आहे. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे दावणीला बांधला, धनुष्यबाण गहाण ठेवला. आम्ही धनुष्यबाण शिवसेना वाचवण्याचं काम केलं. मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीसाठी बेईमानी विश्वासघात केला, तो डाग पुसण्याचं काम आम्ही केलं. सत्तेसाठी भूमिका बदलता, तडजोड करता म्हणून आम्हाला हे करावं लागलं. गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी 2019 ला झाली. हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंत, म्हणजे बाळासाहेबांना तुम्ही चुकीचं ठरवलंत, सत्तेसाठी खूर्चीसाठी', अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray