खेड, 19 मार्च : काहीच दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली होती, याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही जाहीर सभा झाली. या जाहीर सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. याच मैदानात फुसका बार, आपटी बार येऊन गेला. उत्तर आरोप टीकेला द्यायचं असतं. तोच तोच थयथयाट तीच तीच आदळआपट त्याला काय उत्तर देणार? मुंबईतही असाच थयथयाट, आदळआपट मागचे सहा महिने सुरू आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
येत्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडीच्या राज्यभरात सभा होणार आहेत, यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. सर्कशीप्रमाणे राज्यभरात त्यांचे शो होणार आहेत. तेच टोमणे, तेच आरोप तेच रडगाणं, फक्त जागा बदलत जाईल. त्यांच्याकडे खोके-गद्दार हेच दोन शब्द आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
'याच सभेने तुम्हाला उत्तर दिलं आहे. कोकणी माणूस बाळासाहेबांच्या, शिवसेनेच्या आणि धनुष्यबाणाच्या पाठीशी आहे. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे दावणीला बांधला, धनुष्यबाण गहाण ठेवला. आम्ही धनुष्यबाण शिवसेना वाचवण्याचं काम केलं. मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीसाठी बेईमानी विश्वासघात केला, तो डाग पुसण्याचं काम आम्ही केलं. सत्तेसाठी भूमिका बदलता, तडजोड करता म्हणून आम्हाला हे करावं लागलं.
गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी 2019 ला झाली. हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंत, म्हणजे बाळासाहेबांना तुम्ही चुकीचं ठरवलंत, सत्तेसाठी खूर्चीसाठी', अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
मुंबईत बॉम्बस्फोट घडवले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, हीच हिंदुत्वाशी गद्दारी आहे. राहुल गांधी सावरकरांचा अपमान करता, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसता. मणीशंकर अय्यरला बाळासाहेबांनी चपलेने झोडलं होतं. पण राहुल गांधी यांच्या विधानाविषयी आपण काही बोलत नाही, हे कसलं हिंदुत्व? म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
तुम्ही खोके, गद्दार बोलून किती पाप झाकणार, बाळासाहेब वडील होते हे कितीवेळा सांगणार. हे जगाला आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. ते तुमचे वडील असले तरी ते आमचं शिवसैनिकांचं दैवत होतं. वडील वडील म्हणून त्यांना संकुचित करू नका. खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका, असा निशाणा एकनाथ शिंदे यांनी साधला.
जेव्हा काँग्रेससोबत जायची वेळ येईल, तेव्हा शिवसेनेचं दुकान बंद करेन, असं बाळासाहेब म्हणाले होते. तुम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात. तुमची संपत्ती आम्हाला नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मत मागतो, यापेक्षा दुर्दैव काय? मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, शिवसैनिकांना मुख्यमंत्री करेन, असं तुम्ही म्हणाला होतात. तुम्हाला सत्तेचा मोह झाला, तुम्ही वदवून घेतलंत, पण हिंदुत्वाचा विषय आला तेव्हा तुम्ही भूमिका बदलायला लागला. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायलाही तुमची जीभ कचरायला लागली, यापेक्षा दुर्दैव काय? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला.
तुमच्या डोक्यात पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला आणि सगळंच बिघडलं. सगळे वाईट होते ते चांगले झाले, सगळं विसरून गेलात. अशोक चव्हाणांनी शेण खाल्लं असं तुम्ही म्हणालात, मग त्यांच्या पंगतीत बसून तुम्ही काय खात आहात, सांगा. कोण कोणाला डोळा मारत होता, ते आपण पाहिलं. गळ्यात गळे घालत आहेत ते कधी गळा दाबतील कळणार नाही. त्यांचा पूर्व इतिहास तपासून बघा. आम्हाला तुम्ही मिंधे म्हणताय. एकनाथ शिंदे वफादार आहे, मी गद्दार नाही खुद्दार आहे. बेईमानी माझ्या रक्तात नाही, असं एकनाथ शिंदेंनी सुनावलं.
शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं, केसेस अंगावर घेतल्या त्यांना तुम्ही गद्दार आणि खोके म्हणता, तुम्हाला बोलताना थोडंतरी काही वाटलं पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या अंगावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मनोहर जोशींनी बाळासाहेबांसोबत खस्ता खाल्ल्या, त्यांना तुम्ही व्यासपीठावरून खाली उतरवलंत. असा कोणता पक्षप्रमुख आपल्याच नेत्यांविरोधात कारस्थानं करू शकतो? बाळासाहेब असते तर त्यांनी मनोहर जोशींसोबत असं केलं नसतं, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.
एखादा कार्यकर्ता मोठा व्हायला लागला, तेव्हा यांची पोटदुखी सुरू होते. राज ठाकरे काय मागत होते? जो भाग कमजोर आहे तो मला द्या, मी शिवसेना मोठी करतो, असं ते म्हणत होते. ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक होती, तेव्हा मी राज ठाकरेंच्या घरी गेलो. बाळासाहेबांनी भगवा फडकवला त्याला खाली उतरवू देऊ नका, अशी विनंती मी राज ठाकरेंना केली, त्यांनी ती विनंती मान्य केली. मी स्वत:साठी गेलो नाही, ठाण्याचा भगवा उतरू नये म्हणून गेलो. कसा पक्ष मोठा होणार? रामदास कदम, गुलाबरावांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांचा आवाज बंद करता. कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा, कार्यकर्ता छोटा तर पक्ष छोटा. तुमच्यावर हीच वेळ येणार. दरवाजे उघडे ठेवा सगळे जातील. फक्त तुम्ही दोघं राहाल, हम दो हमारे दो. माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढच राहील. आम्ही सगळ्यांनी भोगलं आहे, त्यामुळे मी बोलतोय, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला आहे.
मी फिरणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसून कारभार करणारा मुख्यमंत्री नाही. दिल्लीला, दावोसला गेलो तिकडून विकासासाठी निधी आणि एमओयू आणला. आमच्या अर्थसंकल्पाला तुम्ही गाजर हलवा म्हणालात, पण आम्ही तो तरी दिला, तुम्ही गाजरं दाखवत बसलात, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. कोकणात पूर आला, कोविड आला, तेव्हा एकनाथ शिंदे आला, घरात बसून आदेश देणारा मी मुख्यमंत्री नाही, असा निशाणाही एकनाथ शिंदेंनी साधला.
कोरोना काळात पीपीई कीट घालून काम केलं, हा आमचा गुन्हा आहे? रेमेडिसिविर इंजक्शन मिळवून दिली, हा आमचा गुन्हा आहे? ठाण्याच्या रुग्णालयातला ऑक्सिजन संपलं होतं, तेव्हा ऑक्सिजन मिळवून दिला, 450 जणांचा जीव वाचवला, हा आमचा गुन्हा आहे? एकनाथ शिंदेला दोनदा कोरोना झाला, पण मागे हटलो नाही. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, खोके म्हणता. माझ्याकडे बरंच काही आहे, पण मी ते बोलू इच्छित नाही, पण याचा अर्थ मला काही माहिती नाही, असं नाही. पण सहन करण्याची मर्यादा असते, मर्यादा संपण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असा इशाराही एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav Thackeray