सागर कुलकर्णी, पंढरपूर 12 जुलै : आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरात असले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या घरी भेट दिली आणि पाहुणचार घेतला. यावेळेस गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री विजय कुमार देशमुख, खासदार रणजितसिंह निंबाळकर उपस्थित होते. भालके गेली काही दिवस विखे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते भाजपचा हात धरतील अशी शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होणार आहे.
सिडकोची नवी मुंबईत 86 हजार 700 घरांची बंपर लॉटरी, असा भरा फॉर्म
भालकेंचा कारखाना अडचणीत
भालके यांचे साखर कारखाने सध्या अडचणीत आहेत, भविष्यात सरकारची आर्थिक मदत मिळाली नाही तर अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे भालके हे भाजपामध्ये जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे सत्तेशी जवळीक साधून भालके आपलं राजकीय भविष्य स्थिर करतील असं म्हटलं जातं.
विखे पाटलांच्या माध्यमातून भालके भविष्यात राजकीय नवीन वाट निवडणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्र्यांच्या या साखर पेरणीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत धडकी भरली आहे. लोकसभेतला पराभव, आत्मविश्वासाचा अभाव, लोकांचा उडालेला विश्वास यामुळे विरोधकांची आधीच दाणादाण उडालीय. अशी स्थिती असताना मुख्यमंत्र्यांच्या आक्रमक वाटचालीमुळे अनेक उलथा पालथी होण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.
भालकेंचा विरोध मावळला
विशेष म्हणजे मराठा आरक्षणावरून मागच्या वर्षी आमदार भालके यांनी फडणवीसांवर टीका केली होती. इतकेच नव्हे तर महापूजेस मुख्यमंत्र्यांना अटकाव करण्याचं समर्थनही केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी एकाच वर्षात त्याच आमदारांच्या घरी जात नवीन राजकीय खेळी करत काँग्रेस पक्षात पुन्हा वादळ तयार केलंय. भालके यांनी मात्र मुख्यमंत्री पंढरपूरला आले होते त्यांना घरी बोलवलं होतं. त्यांची ही सदिच्छा भेट होती, यात लगेच राजकीय अर्थ काढणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.