जालना, 4 फेब्रुवारी : 'राजकारणातही भरपूर रेडे आहेत. मात्र राजकारणातील रेड्यांना किंमत नाही,' असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जालन्यातील पशुसंवर्धन एक्स्पो या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.
'पशु संवर्धन एक्स्पोमध्ये एक रेडा 21 कोटी एवढी किंमत असलेला आहे. राजकारणातही भरपूर रेडे आहेत. मात्र राजकारणातील रेड्यांना किंमत नाही,' असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री यांनी हा टोला नेमका कुणाला लगावला, याची आता जोरदार चर्चा होत आहे.
जालन्यातील पशुसंवर्धन एक्स्पोचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारोप करण्यात आला. देशपातळीवर सर्वोत्तम असं पारितोषिक मिळवलेल्या पशूंची मुख्यमंत्री यांनी पाहणी केली.
दरम्यान, याच कार्यक्रमात काल (रविवारी) एकमेकांवर सतत टीकास्त्र सोडणारे भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेदेखील या दोन नेत्यांबरोबर मंचावर उपस्थित होते. शेळ्या-मेंढ्यावाला विभाग म्हणून हिणवल्या जाणाऱ्या या विभागाला देशपातळीवर पशु-प्रदर्शनातून ओळख करून देण्याचं काम मी केलं, असं म्हणत खोतकरांनी दानवे यांना टोला लगावला.
VIDEO : ...जेव्हा आदित्य ठाकरेंच्या मंचावर दोन कट्टर विरोधक एकत्र येतात