'आदित्य ठाकरेच पुढील मुख्यमंत्री', शिवसेनेच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 05:00 PM IST

'आदित्य ठाकरेच पुढील मुख्यमंत्री', शिवसेनेच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...

नांदेड, 31 ऑगस्ट : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यास शिवसेनेनं सुरुवात केली आहे. शिवसेनेचे विधानपरिषद आमदार अनिल परब यांनी नुकतंच याबाबत भाष्यही केलं आहे. 'विधानसभा निवडणुकीत वरळीतला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत,' असं कार्यकर्त्यांशी बोलताना अनिल परब म्हणाले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे.

'शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय?' असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीसं तिरकस भाष्य करत करत 'अनिल परब हे शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का?' असा प्रतिप्रश्न विचारला आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्रिपदावरून सेना-भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच रंगणार हे स्पष्ट आहे.

दरम्यान, जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे राज्याचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत. यादरम्यानच आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे. आदित्य ठाकरेंसाठी मुंबईतल्या सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याचंदेखील काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा पुर्नउच्चार शुक्रवारी (30 ऑगस्ट) वरळी विधानसभा मतदारसंघातील गटप्रमुखांच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

'आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावं', अशी शिवसेनेच्या गटप्रमुखांनी मागणी केली. गटप्रमुखांच्या या मागणीवर आमदार अनिल परब यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा 'ए' प्लस मतदारसंघ आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी इथूनच विधानसभा निवडणूक लढण्याचे निश्चित करावे, असं मत अनिल परब यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेशही त्यांनी वरळीतील शिवसैनिकांना दिला. यापूर्वी युवासेनेने आदित्य यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी देखील आपली इच्छा बोलून दाखवली.

Loading...

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 11:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...