मुख्यमंत्र्यांसमोरच पंकजा मुंडे आणि मेटेंमधील वादाचा भडका, विधानसभेवर गंभीर परिणाम

मुख्यमंत्र्यांसमोरच पंकजा मुंडे आणि मेटेंमधील वादाचा भडका, विधानसभेवर गंभीर परिणाम

विनायक मेटे यांनी भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आक्रमक टीकाही केली होती.

  • Share this:

बीड, 27 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघ सोडून संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीसोबत जाण्याची भूमिका शिवसंग्राम पक्षाच्या विनायक मेटे यांनी घेतली होती. यावेळी त्यांनी भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आक्रमक टीकाही केली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा मुंडे-मेटे वादाचा भडका उडाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीड शहरात पोहोचली. प्रवेश करताना ऐनवेळी आ.विनायक मेटेंनी देवेंद्र फडणवीस यांना हट्ट करून या यात्रेचे स्वागत बीड शहराच्या जवळ अहमदनगर - बीड रोड लगत काकडहिरा या ठिकाणी केलं. यावेळी मेटेंनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं.

विनायक मेटे यांचं भाषण सुरू असताना पंकजा मुंडे आणि खा.प्रीतम मुंडे या महाजनादेश यात्रेच्या गाडीत बसून होत्या. यावेळी विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यानी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर पंकजा मुंडे व्हॅनमधून उतरून सभेच्या ठिकाणी पोहचल्या.

या संपूर्ण प्रकारामुळे बीड भाजपमध्ये पुन्हा एकदा मेटे-मुंडे वादाचा भडका झाला आहे. यामुळे नाराज झालेल्या भाजपा जिल्हा अध्यक्षांनी महाजनादेश यात्रेच्या सभेत प्रास्तविक करताना मुख्यमंत्र्यांसमोर मेटेंवर जहरी टीका केली.

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत घडलेल्या या नाटय़ामुळे पंकजा मुंडेंनीही मग जाहीर भाषणात मेटेंचा चांगलाच समाचार घेतला. 'मुख्यमंत्रीसाहेब तुमचा देवेंद्र तें नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा अशा शुभेच्छा देते. स्व. मुंडे साहेब गेल्यानंतर तुम्ही माझे गुरू आहात. द्रोणाचार्य यांनी अर्जुनापेक्षा कोणी वरचढ होवू नये म्हणून एकलव्यचा अंगठा मागितला होता. मात्र तो अर्जुनासाठी होता. मुख्यमंत्री साहेब तुमच्यासाठी मी एकलव्य होऊन अंगठा द्यायला तयार आहे. पण फक्त तो अर्जुनासाठी असावा इतर कोणासाठी नाही,' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे मेटेवर शरसंधान साधलं आहे.

बीड जिल्ह्यातील मुंडे आणि मेटे यांच्या वादाचा विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप या वादावर कसा तोडगा काढणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

VIDEO:पंकजा मुंडेंची मुख्यमंत्रिपदाची इच्छा इच्छाच राहिली? बीडमध्ये म्हणाल्या...

Published by: Akshay Shitole
First published: August 27, 2019, 8:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading