नागपूर 20 जानेवारी : नागपूरमध्ये गेली दोन दिवस सुरू असलेल्या भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाच्या परिषदेचा रविवारी नागपूरात समारोप झाला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने या खास परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी समारोपाच्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसला मुंबईतली कोट्यवधींची इंदू मिलची जागा हडपायची होती असा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. इंदू मिलवर होणारं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, लंडनमधलं बाबासाहेबांचं घर, दिल्लीतलं आंतरराष्ट्रीय स्मारक अशा अनेक गोष्टी भाजप सरकारनं पूर्ण केल्या आहेत आणि यापुढेही करू असं मुख्यमंत्री म्हणाले. 2022 पर्यंत बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
काँग्रेसला इंदु मिलची जागा हडपायची होती त्यामुळे त्यांनी २० वर्षे बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम रखडवलं.
इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आम्ही प्रयत्न केले.
आम्ही सामाजिक न्याय फक्त भाषणापुरता वापरत नाही, प्रत्यक्षात आणतो .
काँग्रेस ने संविधानाचे जनक असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी एक इंचही जागा दिली नाही. आम्ही तीन दिवसात केंद्राकडून इंदू मिलसाठी जागा मिळवली.
अनुसूचित जातींमध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी असल्याचं सर्वेक्षणात दिसते त्यावर मोदी जी काम करत आहे.
अनेकांना घर नाही त्यांना 2022 पर्यंत प्रत्येकाला घरं देण्याचं काम पंतप्रधान आवास योजनेत पूर्ण होणार आहे.
ज्यांच्या पर्यंत वीज पोहचली नव्हती त्यात 75 टक्के अनुसूचित जाती-जमातीचे लोक होते त्यांच्या पर्यंत वीज पोहचली.