• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मुख्यमंत्र्यांकडून मेहतांची पाठराखण ; विरोधक मात्र, राजीनाम्यावर ठाम

मुख्यमंत्र्यांकडून मेहतांची पाठराखण ; विरोधक मात्र, राजीनाम्यावर ठाम

प्रकाश मेहता यांनी शेरा मारलेला एसआरए प्रकल्प आधीच रद्द झाला आहे, मग घोटाळा कसा? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. तर सरकारने प्रकाश मेहतांचा राजीनामा घेतला नाहीतर आम्ही सभागृह चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिलाय.

  • Share this:
मुंबई, 3 ऑगस्ट : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, त्यांची पाठराखण केलीय. प्रकाश मेहतांच्या एसआरए घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत स्पष्टीकरण दिलं. प्रकाश मेहता यांनी शेरा मारलेला प्रकल्प आधीच रद्द झाला आहे, मग घोटाळा कसा? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. तसंच मेहतांच्या राजीनाम्याची मागणी ही केवळ राजकीय हेतूने होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मात्र तरीही प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करु. चौकशीत काही आढळलं तर मेहतांवर कारवाई करु, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार मागे घेतल्यानंतर दुपारी एक वाजता विधान परिषदेचं कामकाज पुन्हा सुरू झालं. पण सभागृह सुरू होताच विरोधकांनी पुन्हा प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. विधानसभेत मात्र, विरोधक मेहतांच्या राजीनाम्यावरून अजूनही ठाम आहे. सरकारने प्रकाश मेहतांचा राजीनामा घेतला नाहीतर आम्ही सभागृह चालू देणार नाही, असा इशाराच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिलाय. तर मेहता यांनी एसआरएची 'ती' वादग्रस्त फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे या प्रकल्पाला मेहता यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचीही मान्यता होती का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केलाय. राध्येशाम मोपलवारांना हटवलं- मुख्यमंत्री समृद्धी हायवे जमीन घोटाळ्याप्रकरणी मात्र, एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांना चौकशी होईपर्यंत पदावरून हटवण्यात आलंय. एक महिन्याच्या आत ही चौकशी पूर्ण होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मोपलवार यांची दलालासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हारयल झाली होती. मोपलवार यांच्या 'सेटलमेंट'चा आरोप होतोय. काय आहे मेहतांचा एसआरए घोटाळा ? मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पा जादा एफएसआय मंजूर करून घेताना प्रकाश मेहतांनी त्या फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले आहे, असा शेरा मारला होता. हे जादा एफएसआय घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस येताच मुख्यमंत्र्यांनी हा वादग्रस्त एसआरए प्रस्तावच रद्द करून टाकलाय. पण तरीही विरोधक मेहतांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. नियम 293 अन्वये या प्रस्तावावार विधानसभेत चर्चा सुरू आहे.
First published: