मुंबई, 22 मार्च : आज शिवाजी पार्कवर मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. मनसैनिकांकडून पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे पाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
काय म्हणाले राजू पाटील?
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीमधील मनसेच्या कार्यालयात आले होते. मुख्यमंत्र्यांनी विनंतीला मान दिला. ते कार्यालयात आल्यानं आनंद झाला. हिंदुत्वाचा विचार आमचा सुरुवातीपासूनच आहे. आता याही पक्षाचा विचार हा हिंदुत्वाचा आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
आज शिवाजी पार्कवर 'राज गर्जना'; मनसेच्या पाडवा मेळाव्याकडं राज्याचं लक्ष
युतीबाबत सूचक विधान
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्यानं पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका निवडणुकांसाठी युती होणार का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांनी एकत्र यावे का हा निर्णय राज साहेब घेतील, मात्र माझे व्यक्तीगत मत म्हणाल तर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. स्वतंत्र लढलो तर कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, पण राज साहेब बोलले तर एकत्र येऊ असं सूचक विधान राजू पाटील यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, MNS, Raj Thackeray, Shiv sena