उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबद्दल पुन्हा बोलले छत्रपती संभाजीराजे, म्हणाले...

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबद्दल पुन्हा बोलले छत्रपती संभाजीराजे, म्हणाले...

राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 8 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश सध्या तरी बारगळलेला दिसत आहे. मात्र काही दिवसांपासून सुरू असलेली ही चर्चा अद्याप थांबलेली नाही. सर्वच पक्षातील नेत्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांची भूमिका जाहीर केली आहे. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

'उदयनराजे कुठेही असतील तरी मी त्यांचं स्वागत करतो,' अशी प्रतिक्रिया आता संभाजीराजेंनी दिली आहे. याआधीही संभाजीराजेंना उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी संभाजीराजेंनी उदयनराजे जर भाजपमध्ये जाणार असतील तर मी त्यांचं स्वागत करतो, असं म्हटलं होतं.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर सर्वच पक्षात हालचाली

उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले. सर्वात आधी आधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली होती.

उदयनराजेंच्या भाजपमध्ये प्रवेश केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलली जाऊ शकतात. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा भाजप प्रवेश विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. म्हणूनच राजू शेट्टी यांनीही उदयनराजेंची भेट घेतली.

'विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका, अशी उदयनराजे यांना विनंती केली आहे. त्यांनी अजून तसा निर्णय घेतला नाही,' अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर राजू शेट्टी यांनी दिली होती. त्यामुळे उदयनराजे आता नेमका काय निर्णय घेतात, हे पाहावं लागेल.

राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठीही नाही सोपं

राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.

'राष्ट्रवादी मेलबर्न', ऑस्ट्रेलियात पवारांचा कट्टर कार्यकर्ता! पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 8, 2019, 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading