अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 20 मार्च : चार दिवसापूर्वी लग्न झालेल्या तरुणाच्या हातावरील मेहंदी मिटायच्या आतच काळाने झडप घातली. विहिरीवर पाणी मारण्यासाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (ता.17) मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. सोमनाथ साहेबराव इधाटे (वय 23 रा.शेलगाव खुर्द ता. फुलंब्री) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी 13 मार्च रोजी या तरुणाचा विवाह पळशी (ता.सिल्लोड) येथे झाला होता. शुक्रवारी सकाळी सत्यनारायणाची पूजाही झाली होती. सायंकाळच्या सुमारास विहिरीच्या कड्यावर पाणी मारताना ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. या घटनेची वडोद बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे सोमीनाथ साहेबराव इधाटे हा आपल्या आई-वडिलांसह राहत होता. शेलगाव खुर्द ते शेवता या शेतरस्त्यावर मोठी वस्ती आहे. सोमवारी तारीख 13 मार्च रोजी सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील सोमीनाथ इधाटे या तरुणाचा विवाह पार पडला होता. त्यानंतर चार दिवस लग्न करून झाल्यानंतर शुक्रवारी सत्यनारायणची पूजा घरी आयोजित केली होती. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर 17 तारखेला लग्न तिथी दाट असल्याने सोमनाथ इधाटे यांचे आई वडील व पत्नी दुसऱ्या गावी नातेवाईकांच्या विवाहाला गेले होते. त्यानंतर सायंकाळी घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीला नव्याने सिमेंट कडाचे काम करण्यात आले. या कडावर पाणी मारण्यासाठी सोमनाथ इधाटे हा गेला होता.
वाचा - थोडासा वाद अन् पत्नीसह चिमुरड्यासोबत धक्कादायक कांड, मग स्वतःही उचललं भयानक पाऊल
तेव्हा विद्युत मोटर बंद करण्यासाठी बहिणीला आवाज देणार असे सांगितले होते. परंतु, पंधरा-वीस मिनिट झाले तरी भावाने आवाज का दिला नाही म्हणून बहीण विहिरीच्या आसपास पाहायला गेली असता तिथे कोणीही दिसून आले नाही. त्यामुळे तिने आरडाओरोड केला. तेव्हा परिसरातील नागरिक आल्यानंतर त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी अगोदर इतरत्र सोमनाथचा शोध घेतला. मात्र, तो कोठेही आढळून आला नाही. नंतर या विहिरीत शोध घेतला असता रात्री उशिरा बारा वाजता मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेची माहिती वडोद बाजार पोलिसांना देण्यात आली होती. वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर सदरील मृतदेह हा फुलंब्री येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करून सदरील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शेलगाव खुर्द येथे राहत्या घराच्या परिसरात शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची वडोद बाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.